Join us

Zomato ला हवाय चीफ ऑफ स्टाफ, सॅलरी मिळणार नाही; उलट २० लाख द्यावे लागणार, अजब ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 08:51 IST

Zomato Share Price : झोमॅटोनं 'चीफ ऑफ स्टाफ' पदासाठी अनोखी भरती करणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये पहिल्या वर्षी पगार मिळणार नाही. पाहा काय आहे झोमॅटोची ही ऑफर.

Zomato Share Price : झोमॅटोनं 'चीफ ऑफ स्टाफ' पदासाठी अनोखी भरती करणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये पहिल्या वर्षी पगार मिळणार नाही. उलट कँडिडेटला २० लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ती रक्कम फीडिंग इंडियाला दान करण्यात येणार आहे. कँडिडेटला आवडीच्या धर्मादाय संस्थेला ही कंपनी ५० लाख रुपयांची देणगी देणार आहे. दुसऱ्या वर्षापासून त्या व्यक्तीला नियमित वेतन देण्यात येणार आहे. हा पगार ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. मात्र, दुसऱ्या वर्षी चर्चांनंतरच ती रक्कम निश्चित केली जाईल.

या जाहिरातीत झोमॅटोची काम करण्याची अनोखी पद्धत दाखवण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे विविध प्रकारचं टॅलेंट आकर्षित होतील, असा कंपनीचा विश्वास आहे. पैशासाठी नव्हे, तर शिकण्यासाठी आणि योगदान देण्यास उत्सुक असलेल्यांना याद्वारे जोडलं जाईल.

काय म्हटलंय गोयल यांनी?

"मी स्वतःसाठी चीफ ऑफ स्टाफ शोधत आहे. नोकरीसह मिळणाऱ्या सामान्य फायद्यांसह ही पारंपारिक भूमिका नाही. बहुतांश लोकांसाठी ही नोकरी अजिबात आकर्षक नसेल. या पदासाठी पगार मिळणार नाहीये. पहिल्या वर्षी उमेदवाराला २० लाख रुपये भरावे लागतील. यातील १०० टक्के रक्कम थेट फिडींग इंडियाला देण्यात येणार आहेत. दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला ५० लाखांचा निश्चित पगार दिला जाईल. पण आम्ही फक्त दुसऱ्या वर्षांच्या सुरुवातीलाच बोलू," असं झोमॅटोचे सीईओ म्हणाले.

ही कोणती ऑफर?

दीपिंदर गोयल यांच्या म्हणण्यानुसार कॅडिडेटसाठी शिकण्याची ही संधी असेल. अर्जदारांनी चांगल्या पगारापेक्षा शिकण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा. या नोकरीसाठी ज्याची निवड होईल त्याला झोमॅटोच्या ब्लिंकिट, हायपरप्योर आणि फीडिंग इंडिया सारख्या हाय इम्पॅक्ट प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याची संधी मिळेल. त्यातून बरंच काही शिकायला मिळेल, असंही त्यांनी नमूद केलंय.

नोकरीसाठी अर्ज कसा करावा?

या पदासाठी इच्छुक उमेदवारांना बायोडेटाशिवाय २०० शब्दांचं कव्हर लेटर थेट दीपिंदर गोयल यांना पाठवावं लागणार आहे. ज्यांना शिकण्याची भूक आहे त्यांच्यासाठी ही संधी असल्याचंही गोयल म्हणाले.

नोकरीच्या या अनोख्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काही लोक या ऑफरचं कौतुक करत आहेत, तर काही जण पैशांची गरज आणि वर्षभर पगाराशिवाय काम करण्यावरून टीकाही करत आहेत. तर काहींनी याला पब्लिसिटी स्टंट देखील म्हटलंय.

टॅग्स :झोमॅटोनोकरी