Zerodha Nithin Kamath: झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे भारतीय भांडवली बाजाराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जेन स्ट्रीटसारख्या मोठ्या ट्रेडिंग कंपन्यांवर बाजाराचं किती अवलंबित्व आहे, हे येत्या काही दिवसांत समोर येईल, असं त्यांनी नमूद केलं. सेबीनं (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) जेन स्ट्रीट आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना डेरिव्हेटिव्ह बाजारात व्यवहार करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये फेरफार करून कंपनीनं ३६,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा कमावल्याचा आरोप सेबीनं केला आहे.
या कारवाईनंतर शुक्रवारी शेअर बाजारात ब्रोकर आणि एक्सचेंज कंपन्यांचे शेअर्स घसरले. नुवामा वेल्थचे शेअर्स १२ टक्क्यांनी घसरले, तर बीएसई आणि एंजल वनचे शेअर्स ६ टक्क्यांनी आणि सीडीएसएलचे शेअर्स २.५ टक्क्यांनी घसरले.
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
रिटेल ट्रेडिंगवरही परिणाम होऊ शकतो
जेन स्ट्रीटसारख्या प्रॉप ट्रेडिंग कंपन्या सुमारे ५० टक्के ऑप्शन ट्रेडिंग वॉल्यूम हाताळतात आणि जर या कंपन्यांनी बाजारातून माघार घेतली तर त्याचा परिणाम किरकोळ व्यापारावरदेखील होऊ शकतो. याचा फटका केवळ एक्स्चेंजलाच नाही तर ब्रोकर कंपन्यांनाही बसेल, असं कामथ म्हणाले.
मात्र , सेबीच्या या कारवाईचं त्यांनी धाडसी पाऊल असल्याचं सांगत जेन स्ट्रीटवर सेबीनं केलेल्या कारवाईचे कौतुक केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितले. जर आरोप खरे असतील तर हे स्पष्टपणे खुल्या बाजारातील हेराफेरीचे प्रकरण आहे. 'ऑर्डर फ्लो'सारखी व्यवस्था सामान्य आहे, ज्याचा फायदा हेज फंड घेतात, पण भारतातील आपल्या नियामकांनी तसं होऊ दिलं नाही, जे कौतुकास्पद आहे, असंही कामथ यांनी नमूद केलं.
जेन स्ट्रीटनं काय म्हटलं
त्याच वेळी, जेन स्ट्रीटनं सेबीच्या या आरोपांना आव्हान दिलंय आणि आपण या मुद्द्यावर नियामकाशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलंय. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर जेन स्ट्रीटसारख्या मोठ्या कंपन्यांचा सहभाग मर्यादित राहिला तर त्याचा थेट परिणाम ऑप्शन्स मार्केटच्या लिक्विडीटी आणि व्हॉल्यूमवर होईल, ज्यामुळे ब्रोकर कंपन्या आणि सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत, येणारे दिवस भारतीय शेअर बाजारासाठी खूप महत्वाचे ठरू शकतात.