Join us  

Aadhaar ATM च्या माध्यमातून घरबसल्या काढू शकता पैसे, पाहा कशी आहे प्रोसिजर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:30 AM

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा आणल्या आहेत. आता तुम्हाला घरबसल्या पैसे काढता येणार आहेत. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या आधार कार्डाची गरज भासेल.

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांसाठी अनेक नवनव्या सुविधा आणल्या आहेत. आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाइन आधार एटीएम (AEPS) सुविधा सुरू केली आहे. त्याच्या मदतीनं ग्राहकांना घरबसल्या रोख रक्कम मिळू शकेल. त्यांना बँकेत किंवा जवळच्या एटीएमवर जाण्याची गरज नाही. या सेवेत स्थानिक पोस्टमन घरपोच रोख रक्कम पोहोचवतील. 

ही पेमेंट सेवा पूर्णपणे आधार प्रणालीवर आधारित आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती बायोमेट्रिक्स वापरून व्यवहार करू शकते. यासाठी बँक खातं आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. या सुविधेद्वारे रोख पैसे काढण्याव्यतिरिक्त, शिल्लक रकमेची चौकशी आणि खात्याचे तपशील देखील पाहता येतील. 

कॅश मागवण्याची प्रक्रिया 

घरी बसून कॅश मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. यानंतर पोस्टमन मायक्रो एटीएमद्वारे ग्राहकांच्या घरी पोहोचेल. ग्राहकाला फक्त बायोमेट्रिक्स वापरावे लागतील. आधार कार्डची गरज भासणार नाही. ओळखीची पडताळणी होताच पोस्टमन तुम्हाला कॅश देईल. हे पैसे ग्राहकाच्या बँक खात्यातून कापले जातील. 

किती लागेल चार्ज? 

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनुसार, घरपोच रोख रक्कम मागण्यासाठी ग्राहकांकडून कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही. पंरतु, ही डोअर स्टेप सेवा वापरण्यासाठी बँक सेवा शुल्क आकारू शकते. 

एका वेळी किती पैसे काढता येतील 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननं प्रत्येक AEPS व्यवहाराची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली आहे. ग्राहकांना व्यवहारासाठी योग्य बँक निवडावी लागेल. ही रक्कम फक्त प्राथमिक खात्यातून कापली जाईल. चुकीची आधारची माहिती दिल्यास किंवा चुकीची बँक निवडल्यास रिक्वेस्ट रिजेक्ट केली जाईल. 

असा करू शकता वापर? 

सर्वप्रथम, https://ippbonline.com या वेबसाईटवर जा आणि डोअर स्टेप बँकिंगचा पर्याय निवडा. येथे तुम्ही तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता, पिन कोड, तुमच्या घराजवळील सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस आणि तुमचं खातं असलेल्या बँकेचं नाव एन्टर करा. 

यानंतर तुम्हाला I Agree च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर, पोस्टमन काही वेळात तुमच्या घरी पोहोचेल आणि पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करेल.

टॅग्स :आधार कार्डपोस्ट ऑफिसपैसा