Join us

वर्ल्ड ऑफ म्युच्युअल फंड्स : उद्देश सही, म्युच्युअल फंड सही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 06:11 IST

Mutual Funds: आयुष्याच्या टप्प्यात आपल्या गरजा कोणत्या हे निश्चित करणे अत्यंत आवश्यक असते. त्या पूर्ण करण्यासाठी किती रक्कम लागेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार हातात उपलब्ध कालावधी पाहून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरु करता येते. महत्त्वाच्या गोष्टी ज्यास पैसे आवश्यक असतात याची उदाहरणे पाहू.

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक करताना त्यामागील उद्देश ठरवूनच करावी. प्रत्येक व्यक्ती आयुष्यातून मार्गक्रमण करत असताना अनेक टप्प्यात अनेक अशा गोष्टी पुढे येऊन उभ्या राहतात ज्यास मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. ही रक्कम आयत्यावेळेस उभी करणे शक्य नसते. यासाठी आयुष्याच्या टप्प्यात आपल्या गरजा कोणत्या हे निश्चित करणे अत्यंत आवश्यक असते. त्या पूर्ण करण्यासाठी किती रक्कम लागेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार हातात उपलब्ध कालावधी पाहून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरु करता येते. महत्त्वाच्या गोष्टी ज्यास पैसे आवश्यक असतात याची उदाहरणे पाहू.

मुलाचे उच्चशिक्षण : महाविद्यालय पूर्ण झाले की त्यानंतर उच्चशिक्षणासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करायचे असल्यास काही लाखांत रक्कम लागते. यासाठी पूर्वनियोजन करून प्रत्येक महिन्याला थोडी थोडी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये जमा करीत राहावे. उदा. रु. २० लाखांची आवश्यकता असल्यास किमान १० वर्षे प्रत्येक महिन्यास एसआयपी पद्धतीने रु १५,०००/- जमा केल्यास उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते.

मुलीचे लग्न : लग्नात मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक असतो. त्यात सोने आणि लग्नाचा खर्च लक्षात घेता किमान १२ ते १५ वर्षे म्युच्युअल फंडात रक्कम जमा केल्यास आवश्यक निधी उपलब्ध होऊ शकतो. यासाठी गोल्ड फंड आणि इक्विटी फंड अशा दोन म्युच्युअल फंडांची निवड केली जाऊ शकते. नवीन घर / मोठे घर : जसा संसार वाढतो तसे नवीन घरांची गरज भासू शकते किंवा आहे त्या घरापेक्षा मोठे घर आवश्यक वाटते. अशा वेळेस मोठी रक्कम ऐन वेळेस उभी करणे शक्य नसते. आपल्या घराचे स्वप्न किव्वा आहे त्यापेक्षा मोठे घर घेण्याचे स्वप्न काही वर्षे अगोदरच पाहून त्यानुसार म्युच्युअल फंड मध्ये रक्कम गुंतविणे सुरू करा. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीनुसार आपण प्रत्येक महिन्यात सुरू केलेली बचत पुढील काही वर्षांत मोठा संचय होतो.

रिटायरमेंट नियोजन : आता शासकीय आणि खासगी नोकरीत रिटायरमेंटनंतर पेन्शन नसते. यासाठी केंद्र सरकारने एनपीएसची सुरुवात केली. यातील रक्कम इक्विटी व डेट फंडमध्ये गुंतविली जाते.  इतर  म्युच्युअल फंड संस्थासुद्धा रिटायरमेंट प्लान्स ऑफर करतात. कमी वयात जास्त कालावधीसाठी जर गुंतवणूक सुरू केली तर रिटायरमेंट नंतरचा कालावधी ‘आर्थिक’ सुकर जाण्यास निश्चितच मदत होते.

आयुष्यात आर्थिक शिस्त पाळल्यास पैशांची अडचण फार येत नाही. त्यामुळे आयुष्याचे आर्थिक गोल सेट करणे फार आवश्यक असते. कमी वयात हे गोल सेट करणे ज्याला जमले तो त्यानुसार म्युच्युअल फंड माध्यमातून बचतीने नियोजन योग्य पद्धतीने करू शकतो म्हणूनच जर उद्देश सही तर म्युच्युअल फंड पण सही...

 

टॅग्स :गुंतवणूकपैसा