Join us
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या भारतीयांच्या नावावर ₹३.५ लाखांचीही संपत्ती नाही; भारतीय अर्थतज्ञाने जगाचीही झोप उडविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 17:58 IST

अमेरिकेच्या क्षितीजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे.

जग मंदीच्या छायेत असल्याचे भाकीत अनेक अर्थतज्ञ करत आहेत. अशातच अमेरिकेच्या क्षितीजावर नवा राजा उदयास आला आहे, जो जगावर टेरिफ वॉर लादून महागाईत आणखी तेल ओतण्याचे काम करत आहे. चेन्नईतील आर्थिक नियोजन तज्ञ डी मुथुकृष्णन यांनी भारतासमोर काय संकट वाढून ठेवले याबाबत सावध केले आहे. निम्म्या भारतीयांकडे साडे तीन लाखांपेक्षाही कमी संपत्ती आहे, तर जगातील ९० टक्के लोकांचे एका पगाराचे जरी नुकसान झाले तरी ते त्या संकटाला तोंड देऊ शकत नाहीत असा दावा केला आहे. 

एआय, ऑटोमेशन आणि नोकऱ्यांच्या संकटात आर्थिक असमानता वाढत जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे संकट एवढे भीषण आहे की अगदी अतिश्रीमंत देशांमध्येही अब्जावधी लोक असुरक्षित बनणार आहेत. संपत्तीचे केंद्रीकरण आणि तांत्रिक समस्या याला कारणीभूत असणार असे त्यांचे म्हणणे आहे. 

सर्वात श्रीमंत देश असलेल्या स्वित्झर्लंडमध्येही हा फेरा चुकलेला नाही. तिथेही १ टक्के लोकांकडे देशाच्या ४३ टक्के संपत्ती आहे. असे असले तरी स्वित्झर्लंडच्या प्रत्येक व्यक्तीकडे सरासरी ६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारतात हा आकडा साडेतीन लाखही नाही. जगाची सरासरी संपत्ती $८,६५४ आहे. जगातील अर्ध्या लोकांकडे ₹७.५ लाखांपेक्षा कमी संपत्ती आहे. भारताची सरासरी संपत्ती अंदाजे $४,००० आहे. अर्ध्या लोकांकडे ₹३.५ लाखांपेक्षा कमी संपत्ती आहे, असे मुथुकृष्णन यांनी म्हटले आहे. 

यूबीएस ग्लोबल वेल्थ रिपोर्ट २०२४ चा संदर्भ त्यांनी दिला आहे. अमेरिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये सरासरी संपत्ती जास्त आहे, परंतु त्यांच्या सरासरी संख्येत मोठी तफावत दिसून येते. उदाहरणार्थ, अमेरिका सरासरी संपत्तीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे परंतु सरासरी संपत्तीमध्ये १४ व्या क्रमांकावर घसरला आहे, असे ते म्हणाले आहेत. 

जगातील १ टक्के लोकांकडे 8.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.उर्वरित ९९ टक्के लोकांकडे यापेक्षा कमी संपत्ती आहे. जर श्रीमंत देशांचे हे नशीब असेल, तर भारताबद्दल जितके चांगले बोलले जाईल तितके कमीच आहे. जगातील पहिल्या १०% लोकसंख्येचा अपवाद वगळता, ९०% लोक एक पगार गमावूनही जगू शकत नाहीत, अशी परिस्थिती मुथुकृष्णन यांनी मांडली आहे.  

टॅग्स :पैसा