Join us

बर्गरच्या दुकानात करायचे नोकरी, आता लंडनमध्येही आहे व्यवसाय; 'बर्गर सिंग' म्हणून आहेत प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 10:57 IST

कबीर सिंग यांच्या बर्गरची चव आज भारतातच नाही, तर भारताबाहेरही प्रसिद्ध आहे.

 मेहनत करायची तयारी असेल आणि मनात जिद्द असेल तर यशाचं शिखर नक्कीच गाठता येतं. असंच काहीसं करून दाखवलंय कबीर जीत सिंग (Kabir Jeet Singh)यांनी. भारतापासून ब्रिटन आणि अमेरिकेपर्यंत आपल्या या युनिक नावामुळे ते प्रसिद्ध आहेत. बर्गर सिंग (Burger Singh Restaurant) हे त्यांच्या एका रेस्तराँचं नाव आहे. त्यांच्या या रेस्तराँची कहाणी ब्रिटनपासून सुरू होते. सध्या जगभरात बर्गरचे अनेक ब्रँड्स आहेत. परंतु यात भारतीय ब्रँड्स मात्र कमी आहेत. बर्गर सिंगनं केवळ भारतातच नाही, तर ब्रिटनमध्येही प्रसिद्धी मिळवलीये. एकेकाळी बर्गरच्या दुकानात काम करणाऱ्या कबीर सिंग यांची आज १०० पेक्षा अधिक आऊटलेट्स आहेत.

कोण आहेत कबीर सिंग?कबीर जीत सिंग यांचा जन्म लष्करी कुटुंबात झाला. कबीर यांनी आपल्याप्रमाणेच सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, परंतु कबीर यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. पदवीनंतर कबीर जीत सिंग यांनी काही काळ नोकरी केली आणि नंतर पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. २००७ मध्ये जेव्हा कबीर जीत सिंग बर्मिंगहॅम बिझनेस स्कूलमध्ये एमबीए करत होते तेव्हा त्यांना आपल्या गरजा भागवणं कठीण जात होतं. परदेशात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नाईट शिफ्टमध्ये एका बर्गर आउटलेटवर काम करण्यास सुरुवात केली.

अशी झाली सुरुवातकबीर जीत सिंग जेव्हा बर्गरच्या आऊटलेटमध्ये काम करत, तेव्हा काम संपवून त्याला बर्गर खायला मिळायचे. पण मसाल्याशिवाय असलेला बर्गर त्यांना आवडला नाही. यानंतर त्यांनी भारतीय मसाल्यांचा वापर करून बर्गर बनवला. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना आणि मालकालाही तो बर्गर आवडला. मग तिथल्या मालकानं वीकेंडच्या मेन्यूमध्ये कबीर यांच्या बर्गरचा समावेश करायचं ठरवलं. हळूहळू ब्रिटनमधील लोकांनाही कबीर यांच्या बर्गरची चव आवडू लागली. या बर्गरमुळे कबीर तिथे प्रसिद्ध झाले आणि तेथील लोक त्यांना बर्गर सिंग म्हणू लागले.

१५ लाखांत सुरू केला व्यवसायकाही वर्षांनंतर कबीर जीत सिंग भारतात परतले. त्यांनी बर्गर सिंग नावानं व्यवसाय सुरू केला. २०१४ मध्ये त्यांनी १५ लाखांच्या मदतीनं बर्गर सिंगची सुरुवात केली. आज त्यांचे १०० पेक्षा अधिक आऊटलेट्स आहेत. सध्या त्यांचा व्यवसाय ६० कोटींच्या वर गेलाय. बर्गर सिंग नावाच्या या कंपनीला त्यांनी टिपिंग मिस्टर पिंक प्रायव्हेट लिमिटेड या नावानं रजिस्टर केलंय. यानंतर त्यांनी आपला एक जुना मित्र नितीन राणा यांना आपल्यासोबत कामासाठी बोलावलं. २००३ पासून ते पिझ्झा हटमध्ये नोकरी करत होता. त्यांच्या अनुभवाचा फायदा बर्गर सिंगला मिळाला.

आज बर्गर सिंगची आऊटलेट्स दिल्ली, नागपूर आणि थेट लंडनपर्यंत पोहोचली आहेत. कबीर जीत सिंग यांना हा व्यवसाय आणखी देशांमध्ये पोहोचवण्याची इच्छा आहे. आता त्यांचं लक्ष्य अमेरिकेतील भारतीयांवर आहे.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी