Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 09:51 IST

Uday Kotak News: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम लवकरच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांच्या खिशावर होऊ शकतो, अशी भीती दिग्गज बँकर उदय कोटक यांनी व्यक्त केली आहे.

Uday Kotak News: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम लवकरच भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांच्या खिशावर होऊ शकतो, अशी भीती दिग्गज बँकर उदय कोटक यांनी व्यक्त केली आहे. आगामी काही आठवड्यांत भारताला या संघर्षाचे आर्थिक परिणाम सोसावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिलाय.

इंधन दरवाढीचा धोका अजूनही कायम

उदय कोटक यांच्या मते, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्या तरी, त्याचा पूर्ण परिणाम अद्याप भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही. सध्या भारताकडे असलेल्या इंधनाच्या साठ्यामुळे किमतीवर काही प्रमाणात नियंत्रण आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना अद्याप मोठी झळ सोसावी लागलेली नाही. मात्र, येत्या काही महिन्यांत ही परिस्थिती बदलू शकते आणि इंधन दरवाढीमुळे दैनंदिन वस्तू व सेवांच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा

मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसण्याची शक्यता

मध्यमवर्गीय कुटुंबांना सावध करताना कोटक म्हणाले की, ज्या लोकांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांचा इंधनावरील खर्च वाढणार आहे, त्यांना याचा मोठा फटका बसेल. जागतिक अस्थिरता आणि भू-राजकीय तणावाच्या काळात भारत सुरक्षित क्षेत्रात राहू शकत नाही. कोणत्याही संकटाची चाहूल लागण्यापूर्वीच आपण सज्ज राहायला हवं आणि सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहायला हवं, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

कंपन्यांना मोलाचा सल्ला

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी भारतीय कंपन्यांनाही महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जागतिक परिस्थिती वेगाने बदलत असून प्रत्येक देश आपले धोरणात्मक हित जपण्याला प्राधान्य देत आहे. अशा वेळी कंपन्यांनी केवळ तिमाही निकाल किंवा शेअरच्या किमतीवर लक्ष केंद्रित न करता, ३ ते ५ वर्षांच्या दूरगामी दृष्टिकोनातून नियोजन केलं पाहिजे असं ते म्हणाले. याशिवाय अल्पकालीन नफ्यापेक्षा भविष्यातील उद्दिष्टांना अधिक महत्त्व देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

देशाच्या आर्थिक वाढीसाठी प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल संस्था मजबूत होणं गरजेचं असल्याचं कोटक यांनी म्हटलंय. याव्यतिरिक्त, पेन्शन फंड आणि विमा कंपन्यांना योग्य नियामक सुरक्षिततेसह खाजगी बाजारात अधिक गुंतवणूक करण्याची मुभा दिली जावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे. थोडक्यात, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचं सावट भारतीय मध्यमवर्गीयांच्या बजेटवर पडण्याची शक्यता असून, पूर्वतयारी करणं हाच सध्या सर्वोत्तम पर्याय असल्याचं उदय कोटक यांनी सुचवलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Middle class to bear the brunt? Kotak warns of economic crisis.

Web Summary : Uday Kotak warns that conflict in West Asia may impact India's economy, especially the middle class. Rising fuel prices could increase the cost of essential goods and services. Companies should focus on long-term goals and be prepared for global instability to minimize the impact.
टॅग्स :व्यवसायपैसामहागाई