Boycott Turkey Effects: बॉयकॉट तुर्की या ट्रेंडदरम्यान आता मोदी सरकारवर तुर्कस्तान आणि अझरबैजानसोबतचे सर्व प्रकारचे व्यापार बंद करण्यासाठी दबाव येत आहे. तुर्कस्तान आणि अझरबैजानबरोबरच्या व्यापारविषयक मुद्द्यांचा भारत आढावा घेत असून व्यापार संबंधांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या बाबतीत जशी बंदी घालण्यात आली आहे, तशी पूर्ण बंदी येण्याची शक्यता नाही. बिझनेस टुडेनं अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आलीये.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानबरोबरच्या व्यापारावर सध्या कोणतीही बंदी नाही, पण त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर तुर्कस्तान आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून भारतात या दोन्ही देशांसाठी सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडचा परिणाम इतका झाला की, आठवडाभरातच या देशांसाठीचे ६० टक्के ट्रॅव्हल बुकिंग रद्द करण्यात आले.
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
कशाप्रकारे आहे व्यवसाय?
क्रूड पेट्रोलियम, सोनं, विमानं, ग्रॅनाइट आणि संगमरवर आणि सफरचंदसारखी फळं ही तुर्कस्तानमधून भारताची प्रमुख आयात आहे, तर निर्यातीमध्ये अॅल्युमिनियम उत्पादनं, ऑटो कम्पोनंट्स, विमानं आणि दूरसंचार उपकरणं यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये शिखर गाठल्यानंतर अलीकडच्या काळात भारताचा तुर्कस्तानबरोबरचा व्यापार कमी होत आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान तुर्कस्तानला भारताची एकूण निर्यात १४.८ टक्क्यांनी कमी होऊन ५.२१ बिलियन डॉलरवर आली आहे, तर आयात १७.२५ टक्क्यांनी कमी होऊन २.८ बिलियन डॉलर्स झाली आहे.
भारताचा अझरबैजानबरोबरचा व्यापार आणखी कमी आहे. एप्रिल ते फेब्रुवारी २०२४-२५ या कालावधीत भारतानं अझरबैजानला केवळ ८६.०७ मिलियन डॉलरची निर्यात केली, तर अझरबैजानमधून १.९३ मिलियन डॉलरची आयात केली. भारतातून अझरबैजानला होणाऱ्या प्रमुख निर्यातीमध्ये तंबाखू, कॉफी आणि चहा यांचा समावेश आहे, तर आयातीमध्ये पशुखाद्य, सेंद्रिय रसायनं, आवश्यक तेलं आणि परफ्यूम यांचा समावेश आहे.
पाकिस्तानसोबतचाही व्यापार बंद
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं. पहलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात झालेल्या निदर्शनांनंतर भारतानं पाकिस्तानशी होणाऱ्या सर्व व्यापारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता याच पद्धतीनं तुर्कस्तान आणि अझरबैजानबरोबरच्या व्यापारी संबंधांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. कॅटनं शुक्रवारी आयोजित केलेल्या व्यावसायिक लीडर्सच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील १२५ हून अधिक प्रमुख लीडर्सनं तुर्कस्तान आणि अझरबैजानबरोबर प्रवास आणि पर्यटनासह सर्व प्रकारच्या व्यापार आणि व्यावसायिक संबंधांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला.