Join us

पेपर नोट्सच्या जागी देशात Plastic Currency Notes येणार का? पाहा अर्थमंत्रालयानं काय म्हटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 13:15 IST

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत यावर उत्तर दिलं आहे.

देशात सध्या चलनात असलेल्या कागदी नोटा सरकार बदलणार आहे का? कागदी नोटांच्या जागी प्लॅस्टिकच्या नोटा चलनात येणार का, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. याबाबत संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात आले. यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Choudhary) यांनी उत्तर दिलं आहे. 

प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी प्लास्टिक नोटांसंदर्भातील प्रश्न विचारला. इतर देशांत वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक चलनाच्या धर्तीवर सध्याचे कागदी चलन (प्लास्टिक करन्सी नोट्स) बदलण्याचा सरकार विचार करत आहे का? अनेक देशांमध्ये या नोटा बऱ्यापैकी टिकाऊ असल्याचं सिद्ध झालं आहे. एवढंच नाही तर त्यांचं बनावट चलन तयार करणं खूप कठीण असल्याचं अनिल देसाई म्हणाले. 

या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं की, देशात प्लास्टिक चलन सुरू करण्याबाबत सध्या कोणताही विचार केला जात नाहीये. पण बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आणि त्यांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. 

यापूर्वी आखलेली योजना 

२०१५-१६ च्या वार्षिक अहवालानुसार, रिझर्व्ह बँकेनं १० रुपयांच्या प्लास्टिक नोटा जारी करण्याची योजना आखली होती. ज्यासाठी पाच शहरांची निवड करण्यात आली होती. जिथे प्रायोगिक तत्वावर या नोटा वितरित केल्या जाणार होत्या. या शहरांमध्ये कोची, शिमला, जयपूर, भुवनेश्वर आणि म्हैसूर या शहरांचा उल्लेख होता.

टॅग्स :राज्यसभापैसासरकार