Ola Electric Founder Bhavish Aggarwal: ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण गोवा येथील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगानं भाविश अग्रवाल यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक तक्रारीशी संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी नोटीस देऊनही आयोगासमोर उपस्थित न राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
आयोगानं बंगळुरू पोलिसांना असे निर्देश दिले आहेत की, गरज पडल्यास अग्रवाल यांना ताब्यात घेऊन २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता आयोगासमोर हजर करावं. हे जामीनपात्र वॉरंट असल्यानं, १.४७ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या एका जामीनदारावर त्यांची सुटका होऊ शकते.
नेमकं प्रकरण काय?
हे संपूर्ण प्रकरण गोव्यातील रहिवासी प्रीतेश चंद्रकांत घडी यांच्या तक्रारीशी संबंधित आहे. त्यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये खरेदी केलेल्या १.४७ लाख रुपये किमतीच्या 'Ola S1 Pro Second Gen' या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत आयोगाकडे धाव घेतली होती. तक्रारीनुसार, स्कूटर खरेदी केल्यानंतर काही काळातच त्याच्या मोटरमधून विचित्र आवाज येऊ लागला आणि टचस्क्रीनमध्येही बिघाड झाला. तक्रारदाराने ही स्कूटर दुरुस्तीसाठी गोव्यातील वास्को येथील ओला इलेक्ट्रिक डीलरकडे जमा केली होती, मात्र बराच काळ लोटूनही त्यांना आपली स्कूटर परत मिळाली नाही. कंपनीशी वारंवार संपर्क साधूनही कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि अतिरिक्त शुल्क देऊनही समस्या सुटली नाही, असा आरोप ग्राहकानं केला आहे.
आयोगानं काय म्हटलं?
२० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान आयोगानं नमूद केलं की, संबंधित वाहनाची सध्याची स्थिती आणि ते नेमकं कुठे आहे हे स्पष्ट नाही. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक लिमिटेडचे सीईओ आणि संस्थापकांनी वैयक्तिकरित्या हजर राहून, वाहन कुठे आहे आणि ग्राहकाच्या विनंतीनंतरही ते अद्याप का परत केलं नाही, याचे स्पष्टीकरण द्यावं. आयोगाने ४ फेब्रुवारी रोजी भाविश अग्रवाल यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
मात्र, दिलेल्या तारखेला ते उपस्थित न राहिल्यामुळे आयोगानं १,४७,४९९ रुपयांच्या रकमेचं जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. या वॉरंटची अंमलबजावणी संबंधित पोलीस स्टेशनमार्फत (बंगळुरू) करण्यास सांगण्यात आलंय. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यात पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित केली जाईल.
Web Summary : Ola Electric's Bhavish Aggarwal faces arrest warrant for skipping consumer court. A Goa resident complained about issues with his Ola S1 Pro scooter and lack of resolution. The court demands Aggarwal's presence to explain the scooter's status.
Web Summary : ओला इलेक्ट्रिक के भाविष अग्रवाल उपभोक्ता अदालत में पेश नहीं हुए, गिरफ्तारी वारंट जारी। गोवा निवासी ने ओला एस1 प्रो स्कूटर में खराबी और समाधान न होने की शिकायत की। अदालत ने अग्रवाल को स्कूटर की स्थिति स्पष्ट करने के लिए बुलाया।