Join us

हस्तांतरणापूर्वी एअर इंडियाचे विद्यमान संचालक देणार राजीनामे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 13:11 IST

सध्या एअर इंडियाच्या संचालक मंडळावर सात सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, चार कार्यकारी संचालक आणि सरकारनियुक्त दोन संचालकांचा समावेश आहे.

मुंबई  : एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, ही कंपनी टाटांना सुपूर्द करण्यापूर्वी विद्यमान संचालक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. तसे आदेश वरिष्ठ नेतृत्त्वाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यात होणारी संचालक मंडळाची बैठक त्यांच्या कारकिर्दीतील शेवटची बैठक ठरू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.सध्या एअर इंडियाच्या संचालक मंडळावर सात सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, चार कार्यकारी संचालक आणि सरकारनियुक्त दोन संचालकांचा समावेश आहे. विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे दिल्यानंतर टाटा समूहाकडून नवीन संचालक मंडळाची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर २३ जानेवारीपासून ते एअर इंडियाचे संचालन स्वतःच्या हाती घेतील. त्यामुळे हस्तांतरणाआधी विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत, असे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. एअर इंडियाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सर्व संचालकांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या वा तिसऱ्या सप्ताहात होणाऱ्या बैठकीत सर्व सातही संचालक राजीनामे देतील. 

टॅग्स :एअर इंडियाव्यवसायटाटा