US-India Trade : डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्के देण्याचे काम करत आहेत. पण, आपल्या आक्रमक धोरणामुळे ट्रम्प फक्त इतर देशच नाही तर अमेरिकेलाही खड्ड्यात घालत असल्याची शक्यता आहे. पीएम मोदींच्या भेटीनंतरही ट्रम्प यांची भारताविषयीच्या भूमिकेत बदल झालेला दिसत नाही. ट्रम्प यांनी कॅनडा-मेक्सिकोवर २५ टक्के आयात शुल्क लादले आहे, तर चीनवर १० टक्के शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. मात्र, यातून भारतही सुटणार नसल्याचे दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांचे सरकार लवकरच भारत आणि चीनसारख्या देशांवर प्रत्युत्तर शुल्क लागू करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प यांनी सांगितलेल्या गोष्टीचा त्यांनी शुक्रवारी पुनर्उच्चार केला. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये सांगितले की, आम्ही लवकरच प्रत्युत्तर आयात शुल्क लागू करू करणार आहे. म्हणजे जे देश आमच्यावर २० टक्के कर लावत असतील, त्या देशांवर अमेरिकाही तेवढाच कर लादणार.
जशास तसे करण्याची ट्रम्प यांची नितीट्रम्प म्हणाले गोष्ट सोपी आहे, कोणतीही कंपनी किंवा देश, जसे की भारत किंवा चीन किंवा इतर कोणीही... आमच्याकडून जेवढा शुल्क आकारतात, तेवढाच शुल्क आम्ही लादणार आहोत. याआधी मंगळवारी ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे स्पष्ट केले आहे की भारताला अमेरिकेच्या प्रत्युत्तर शुल्कातून सूट दिली जाणार नाही.
ते म्हणाले, आयात शुल्काच्या मुद्द्यावर माझ्याशी कोणी वाद घालू शकत नाही. विशेष म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी, पंतप्रधान मोदी यांच्या व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या द्विपक्षीय बैठकीच्या काही तास आधी, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी प्रत्युत्तर शुल्काची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत, ट्रम्प प्रशासन प्रत्येक परदेशी व्यापार भागीदारावर अंदाजे समान शुल्क लादणार आहे.