Donald Trump Tariff On India: अमेरिकेनं भारतावर ५०% कर लादला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अनेक वेळा टॅरिफ किंग म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरही नाराजी व्यक्त केलीये. आता व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी भारतावर इतका जास्त कर का लादला गेला हे स्पष्ट केलंय.
अमेरिका रशिया-युक्रेन वाद थांबवू इच्छिते. त्यासाठी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं थांबवावं लागेल. युक्रेन वाद थांबावा म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला, असं कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केलं. प्रथम २५% कर लादण्यात आला, नंतर रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याच्या बहाण्यानं आणखी २५% कर लादण्यात आला. यानंतरही अमेरिका आणखी कर लादण्याची धमकी देत आहे. "रशियाला युक्रेन संघर्ष सुरू ठेवण्यापासून रोखण्यासाठी भारतावर नवीन कर लादण्यात आलेत," असं त्यांनी स्पष्ट केलं.
व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
मॉस्कोवर दुसरा दबाव
निर्बंध लादण्याचा उद्देश फक्त मॉस्कोवर दुसरा दबाव आणणं आहे. यासाठी ते जनतेवर प्रचंड दबाव आणत असल्याचं लॅविट म्हणाल्या. ट्रम्प हे युद्ध संपलेले पाहू इच्छित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली आहे. जी त्यांनी सकारात्मक असल्याचं म्हटलंय. ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्रिपक्षीय बैठकीची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यापूर्वी पुतिन आणि झेलेन्स्की यांनी द्विपक्षीय शिखर परिषद आयोजित करावी अशी त्यांची इच्छा आहे.
ट्रम्प यांना शांतता हवी
लेविट म्हणाल्या, ट्रम्प शक्य तितक्या लवकर शांतता प्रस्थापित करू इच्छितात. नाटो सेक्रेटरी जनरलसह सर्व युरोपियन नेते व्हाईट हाऊसमधून बाहेर पडत आहेत. ट्रम्प रशिया आणि युक्रेनमधील द्विपक्षीय चर्चा यशस्वी करण्यासाठी शांततेचे प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ४८ तासांनी, राष्ट्राध्यक्षांनी व्हाईट हाऊसमध्ये या सर्व युरोपियन नेत्यांची भेट घेतली.
लेविट यांनी व्हाईट हाऊसप्रमाणेच असाही दावा केला की जर ट्रम्प सत्तेत असते तर युद्ध सुरू झालं नसतं. ट्रम्प यांनीही हे अनेक वेळा सांगितले आहे. अमेरिका रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्याचं कारण देत भारतावर शुल्क वाढवत असेल, परंतु भारताव्यतिरिक्त, अनेक देश आणि अमेरिका देखील रशियाशी व्यापार करतं. यावरून ट्रम्प सरकारची दुतोंडी भूमिकाच दिसून येते.