इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टीममध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ट्रम्प यांनी सरकारी नियम सोपे करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सरकारी कार्यक्षमता विभाग (डीओजीई) स्थापन केला आहे. त्यांनी इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांची या विभागाच्या नेतृत्वासाठी नियुक्ती केली आहे. मस्क आणि विवेक रामास्वामी हे नुकतेच नव्यानं स्थापन झालेल्या विभागाच्या टीममधील सदस्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते.
या दरम्यान त्यांनी आपला मुलालादेखील (X Æ A-Xii) सोबत आणलं होतं. त्यानंतर मस्क यांनी आपल्या मुलाचा व्हिडिओ पोस्ट केला. यात त्यांनी अमेरिकेला वाचवण्याचा आणि ट्रम्प यांना मदत करण्याचा सल्ला दिला. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. नेटकरी मस्क यांच्या मुलाच्या बोलण्याचं कौतुक करत आहेत.
ट्रम्प यांच्या टीममध्ये समावेश
इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये सामील झाले आहेत. सरकारच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी त्यांना आणि विवेक रामास्वामी यांना डीओजीई या नवीन विभागाचे प्रमुख करण्यात आलंय. नुकतेच दोन्ही अब्जाधीश कॅपिटल हिल येथे गेले होते. तेथे त्यांनी आपल्या नव्या सल्लागार टीमबद्दल चर्चा केली. फेडरल सरकारचे नियम आणि खर्चात कपात करणं हे या पथकाचं काम आहे. कॅपिटल हिलमधील फोटोंमध्ये दोन्ही अब्जाधीश त्यांच्या नव्या भूमिकेसाठी उत्सुक दिसत होते.
मस्क यांच्या मुलानं दिला 'हा' सल्ला
मस्क यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलालाही सोबत आणलं होतं. तो त्यांच्या खांद्यावर बसलेला दिसला. त्यानंतर काही दिवसांनी मस्क यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या मुलाचा एक छोटासा मेसेज होता. १० सेकंदाच्या क्लिपमध्ये त्यांचा मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला आहे आणि मस्क त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत. मस्क आपल्या मुलाला विचारतात, 'मी काय केलं पाहिजे? यावर त्यांचा मुलगा त्यांना अमेरिकेला वाचवा असं उत्तर देतो. यावर ते त्याला परत आणखी काय असा प्रश्नही करतात. यावर तो त्यांना "ट्रम्प यांना मदत करा," असं उत्तर देतो.
मुलाच्या नावाचा अर्थ काय?
मस्क यांचा चार वर्षांचा मुलगा एक्स या नावानेही ओळखला जातो. त्याचं पूर्ण नाव X Ash A Twelve असं आहे. मस्क यांनी यापूर्वी खुलासा केला होता की, हे नाव त्यांची पार्टनर कॅनेडियन संगीतकार ग्रिम्सनं ठेवलं होतं.