Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:14 IST

Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंद' पान मसाल्याची कहाणी सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वीची आहे. कंपनीचे मालक एकेकाळी पान मसाला विकायचे. कमला पसंदचे मालक कमल किशोर चौरसिया हे कानपूरचे रहिवासी आहेत.

Kamla Pasand Owner Net Worth: प्रसिद्ध पान मसाला कंपनी 'कमला पसंद' आणि 'राजश्री'चे मालक कमल किशोर चौरसिया यांची सून दीप्ती चौरसिया यांनी मंगळवारी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह दिल्लीतील वसंत विहार येथील त्यांच्या निवासस्थानी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट देखील मिळाली आहे. 'कमला पसंद' पान मसाल्याची कहाणी सुमारे ४०-४५ वर्षांपूर्वीची आहे. कंपनीचे मालक एकेकाळी पान मसाला विकायचे.

'कमला पसंद'च्या मालकाचा प्रवास

कमला पसंदचे मालक कमल किशोर चौरसिया हे कानपूरचे रहिवासी आहेत. ८० च्या दशकात त्यांनी घरीच पान मसाला बनवून विकण्यास सुरुवात केली. ते घरी तयार केलेला पान मसाला काहू कोठी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्या दुकानावर विकायचे. त्या काळात पान मसाला पॅकेटमध्ये नव्हे, तर सुटा विकला जात असे. कमल किशोर यांच्या कामात त्यांचे कुटुंबीय मदत करत असत. आज त्यांचे अनेक ब्रँड्स बाजारात उपलब्ध आहेत. अमिताभ बच्चन, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग यांसारख्या अनेक मोठ्या व्यक्तींनी कमला पसंद पान मसाल्याची जाहिरात केली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

अनेक क्षेत्रांत विस्तारलेला व्यवसाय

कमला पसंद पान मसाल्याची मालकी केपी ग्रुपकडे आहे. २००० नंतर कमल किशोर यांनी मोठी प्रगती केली. कमला पसंदसोबतच त्यांनी राजश्री गुटखा देखील विकण्यास सुरुवात केली. त्यांनी रिअल इस्टेट आणि लोखंडाच्या व्यवसायातही पाऊल ठेवलं आणि त्यातही त्यांना यश मिळालं. कानपूरच्या नयागंज येथील लाल फाटक येथे आजही त्यांचे कार्यालय आहे.

वादांशीही जोडला गेलं नातं

कमल किशोर यांच्या व्यवसायाचा अनेक वादांशी संबंध राहिला आहे. त्यांच्या कंपनीवर अनेकवेळा ईओडब्ल्यू (EOW) सह अनेक विभागांनी जीएसटी आणि इन्कम टॅक्स संबंधी छापे टाकले आहेत. अनेकवेळा तपासणीत असं समोर आलं आहे की, त्यांनी घोषित केलेल्या उत्पन्नापेक्षा कंपनीत उत्पादन जास्त होतं. एकदा टाकलेल्या छाप्यादरम्यान कानपूर येथील कारखान्यात सुमारे २०० मजूर आढळले होते, परंतु त्यांची संख्या कमी दाखवण्यात आल्याचं उघड झालं होतं. इतकंच नाही तर, त्यांच्या कंपनीवर सुमारे १५० कोटी रुपयांच्या एक्ससाईज ड्युटीची चोरी केल्याचाही आरोप लागला आहे.

कंपनीची अंदाजित कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४ पर्यंत देशातील पान मसाल्याचा व्यवसाय सुमारे ४६,८८२ कोटी रुपये इतका आहे. २०२५ ते २०३३ दरम्यान या बाजाराची वाढ ३.६०% राहू शकते आणि २०३३ मध्ये हा व्यवसाय ६४,४४६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमला पसंदचे बाजार भांडवल (Market Cap) सुमारे ३००० कोटी रुपये आहे. काही बातम्यांनुसार, कंपनीनं २०२० मध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त टॅक्स भरला होता. यावरून कंपनीचा व्यवसाय किती मोठा आहे, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. मात्र, कमल किशोर यांची एकूण संपत्ती किती आहे, याची कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kamla Pasand Owner: From Street Vendor to Pan Masala King

Web Summary : Kamla Pasand's owner, Kamal Kishore Chaurasia, started selling pan masala on the streets. His daughter-in-law recently died. The company, now KP Group, expanded into real estate and iron, facing tax scrutiny. The pan masala market is worth billions.
टॅग्स :व्यवसायपैसा