Join us

कधी येणार Reliance Jio चा आयपीओ, IPO साईज देशातील सर्व रेकॉर्ड मोडणार का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:34 IST

Reliance Jio IPO : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या टेलिकॉम युनिट रिलायन्स जिओ इन्फोकॉम आयपीओची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Reliance Jio IPO : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industries) टेलिकॉम युनिट रिलायन्स जिओ इन्फोकॉम आयपीओची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्याचा आयपीओ लवकरच येऊ शकतो. आयपीओची साईज सुमारे ३५,०००-४०,००० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

या आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारकांकडून नवीन शेअर्स विक्री आणि ऑफर फॉर सेलद्वारे (ओएफएस) जारी केले जातील. कंपनी आपल्या इश्यूमध्ये प्री-आयपीओ प्लेसमेंट क्लॉज देखील ठेवू शकते. विशेष म्हणजे हा आयपीओ चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात बाजारात येण्याची शक्यता आहे.

इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ?

रिलायन्स जिओनं ३५ ते ४० हजार कोटी रुपयांचा आयपीओ आणला तर तो इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. आतापर्यंत एवढ्या मोठ्या आकाराचा आयपीओ भारतात आलेला नाही. रिलायन्स जिओचं मूल्यांकन १२० अब्ज डॉलर (सुमारे १० लाख कोटी रुपये) असण्याची शक्यता आहे कारण आरआयएल सपोर्टिव्ह रिटेलसह नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीमध्ये मध्यवर्ती गुंतवणूकदार आहे. ब्रोकरेज फर्म रिलायन्स जिओचं अंदाजे मूल्यांकन १०० अब्ज डॉलर्स असू शकतं असं म्हणत आहेत.

दरम्यान, रिलायन्स जिओनं यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. ओएफएस अनेक विद्यमान भागधारकांना आंशिक किंवा पूर्णता बाहेर पडण्याची संधी देऊ शकते असं म्हटलं जातंय. रिलायन्स जिओमध्ये ३३ टक्के परदेशी गुंतवणूकदार आहेत. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, सिल्व्हर लेक, मुबाडाला, केकेआर आणि अन्य गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली होती. २०२० मध्ये कंपनीनं १८ बिलियन डॉलर्स उभे केले होते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :रिलायन्स जिओइनिशिअल पब्लिक ऑफरिंग