Swiggy Order : जगभरातील हजारो लोकांनी काल रात्री सेलिब्रेशन करत नवीन वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत केलं. खाण्यापिण्यापासून फटाके फोडून विविध पद्धतीने जल्लोष करण्यात आला. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या वेळी लोकांनी बाहेरून जेवण मागवले. या काळात फूड मार्केटप्लेस स्विगीने प्रचंड ऑर्डर्स पोहचवण्यासाठी जबरदस्त तयारी केली होती. कंपनीचे सीईओ रोहित कपूर यांनी हा दिवस त्यांच्या कंपनीसाठी सर्वात मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोल घेतला होता. यात काही पदार्थांच्या नावांचा पर्याय देऊन मतदान करण्याचे आवाहन केलं होतं. याचा निकाल तुम्हालाही आश्चर्याचा धक्का देईल.
कपूर यांनी X वर 'Swiggy चे डिलिव्हरी पार्टनर, रेस्टॉरंट पार्टनर आणि ऑपरेशन्स टीमचे आभार मानले. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन अखंडपणे पार पाडण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचे कौतुक केलं. यासोबत त्यांनी नागरिकांचा ऑनलाईन कौल घेतला. यासोबत नवीन वर्षाच्या स्वागताला तुम्ही कोणते खाद्यपदार्थ मागवले? असा प्रश्न विचारला. यासाठी पिझ्झा, बर्गर आणि बिर्याणी, असे पर्याय देण्यात आले होते.
अनेकांची पसंती एकच..सर्वेक्षणानुसार, सर्वाधिक ५८.७% लोकांनी बिर्याणीला मतदान केले. ३४.६% लोकांनी पिझ्झाच्या बाजूने तर ६.७% लोकांनी बर्गरच्या बाजूने मतदान केले. कपूर म्हणाले की, सर्वाधिक बुकिंग बेंगळुरू आणि त्यानंतर पुणे आणि जयपूरमधून होत आहे. ते म्हणाले की बिर्याणी ऑर्डरच्या बाबतीत बेंगळुरू अव्वल आहे. तिथले लोक हैदराबादी बिर्याणी ऑर्डर करत आहेत. स्विगीच्या सोशल मीडिया टीमने सांगितले की, २,२४,५९० युजर्सनी पिझ्झा ऑर्डर केला आहे. बेंगळुरूमध्ये, १,५४,२५४ वापरकर्त्यांनी इतर खाद्यपदार्थही मागवले होते.
स्विगी वापरकर्त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांमध्ये बर्गरचाही समावेश होता. एका पोस्टमध्ये कंपनीने लिहिले की, 'हे सर्व लोक फक्त बर्गरच का खातात? आतापर्यंत ११६०९९ बर्गरच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. तुम्हाला अजून काही खाण्याचं डोक्यात येत नाही का?'