Bharat Taxi Services: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मार्चमध्ये 'सहकार टॅक्सी' सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता या सेवेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. नोव्हेंबरमध्ये 'भारत टॅक्सी' या ब्रँड नावानं त्याचं सॉफ्ट लाँचिंग केलं जाईल. डिसेंबरपासून दिल्ली आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात या सेवा सुरू केल्या जातील. ही ओला-उबेरसारखी अॅप-आधारित सेवा असेल, परंतु त्यांच्यापेक्षा स्वस्त असेल. तसंच, ही सेवा प्रीपेड बूथद्वारे लोकांना दिली जाईल. यासाठी विमानतळ, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवर स्वतंत्र प्री-पेड बूथ बनवले जातील. तेथून, लोक अॅपशिवाय देखील बूथवर जाऊन टॅक्सी बुक करू शकतील.
सहकार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या सेवेबद्दल एका अधिकाऱ्यानं सांगितले की, ओला-उबर सारख्या अॅप-आधारित कॅबपेक्षा ही सेवा निश्चितच स्वस्त असेल. यामध्ये चालकांना कमिशनच्या स्वरूपात जास्त पैसे मिळतील. लोकांसाठीही ते थोडं स्वस्त असेल. समिती चालकांकडून कमी कमिशन कापेल. यामुळे चालकांना अधिक नफा मिळेल. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही सर्ज प्राइसिंग सिस्टम नसेल. म्हणजेच, गर्दीच्या वेळी किंवा मागणी वाढल्यावर त्याच्या बुकिंगच्या किमती वाढणार नाहीत. लग्नाचा हंगाम असो किंवा सकाळ-संध्याकाळ ऑफिसच्या वेळेत किंमत तितकीच असेल.
किती चालकांनी नोंदणी?
त्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गांभीर्यानं काम केलं जात आहे. आतापर्यंत देशातील चार राज्यांमधील ६१४ चालकांनी सहकार सहकारी मर्यादित संस्थेत नोंदणी केली आहे. त्यापैकी सर्वाधिक २५४ चालक दिल्लीतील आहेत, त्यानंतर गुजरातमधील १५०, महाराष्ट्रातील ११० आणि उत्तर प्रदेशातील १०० चालकांनीही त्यांच्या प्रणालीत नोंदणी केली आहे. चालकांची ही संख्या वाढत आहे. चालकांनाही त्याचे सदस्य बनवले जाईल. भविष्यात ते संचालक पातळीपर्यंत पोहोचू शकतील.
आयआयएम बंगळुरू देखील काम करतंय
आयआयएम बंगळुरू देखील एक अभ्यास करत आहे. कोणत्या राज्यातील कोणत्या शहरात लोक किती कॅब बुक करतात हे शोधून काढेल. शक्य तितक्या लोकांना फायदा व्हावा हा त्याचा उद्देश आहे. आयआयएम बंगळुरू त्याच्या मार्केटिंगवर देखील काम करत आहे. त्यात दुचाकी, कार, ऑटो-रिक्षा आणि इतर लक्झरी वाहनं देखील जोडली जातील. यामध्ये, आठ तासांसाठी किंवा प्रति ट्रिप टॅक्सी बुक करता येतील. इतर खाजगी ऑपरेटर्सपेक्षा ती अधिक सुरक्षित असेल. दिल्ली आणि गुजरातपासून सुरुवात केल्यानंतर, ही सेवा टप्प्याटप्प्याने देशातील इतर राज्यांसाठी सुरू केली जाईल.