Join us

आमच्यावर लाचखोरीचे कोणतेही आरोप नाहीतच; अदानी ग्रीन एनर्जीनं केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 06:52 IST

‘अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ने एक्सचेंज फायलिंगमध्ये बुधवारी दिली माहिती 

नवी दिल्ली - उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अमेरिकेत केलेल्या कथित लाचखोरीच्या आरोपांत विदेशी भ्रष्ट व्यवहार अधिनियमांनुसार (एफसीपीए) कोणताही आरोप केलेला नाही, अशी माहिती बुधवारी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या (एजीईएल) वतीने देण्यात आली. 

कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात सिक्युरिटीज फसवणूक आणि वायर फसवणूक या संदर्भातील आरोप लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. 

अदानी समूहाचे म्हणणे काय?

एजीईएलने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, मागील आठवड्यात अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने दाखल केलेल्या याचिकेत अदानी समूहाचे संस्थापक-अध्यक्ष गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यावर केलेल्या आरोपात एफसीपीएचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्याच्या कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही.

एजीईएलवर आरोप आहे की, वीज वितरणाचे कंत्राट मिळवण्याठी कंपनीने भारतातील अधिकाऱ्यांना २६.५ कोटी डॉलर्सची लाच दिली. यातून कंपनीला २० वर्षांत २ अब्ज डॉलर्सचा फायदा होण्याची शक्यता होती. कंपनीने म्हटले आहे की, तीन अधिकाऱ्यांवर केवळ सिक्युरिटीज फसवणूक व वायर फसवणुकीसंदर्भातील आरोप आहेत. या आरोपांमध्ये होणारा दंड लाचखोरीच्या तुलनेत कमी असतो. 

गौतम तसेच सागर अदानी यांच्यावर उपरोक्त उल्लंघनासह अदानी ग्रीन एनर्जीला यासाठी मदत करणे, तसेच प्रोत्साहित केल्याची दिवाणी तक्रारही केली आहे. अदानी समूहाने मागच्या आठवड्यात या सर्व आरोपांचे खंडन करून बचावासाठी सर्व प्रकारची कायदेशीर मदत घेण्याची माहिती दिली होती. 

अदानी समूहाचे शेअर्स तेजीत

अदानी समूहावर झालेल्या आरोपांनंतर शेअर बाजारात आलेल्या विक्रीच्या माऱ्याला आज अदानी समूहाच्या खुलाशानंतर ‘ब्रेक’ लागला. अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत आले. या वाढीमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्यात वाढ झाली.

कोणते शेअर्स किती वाढले?

अदानी टोटल गॅस     १९.७६% अदानी पॉवर     १९.६६% अदानी एंटरप्रायझेस     ११.५६% अदानी एनर्जी सोल्युशन्स         १०% अदानी ग्रीन एनर्जी     १०% एनडीटीव्ही     ९.३५% अदानी विल्मर    ८.४६% अदानी पोर्ट्स            ६.२९% सांघी इंडस्ट्रीज    ४.७३% अंबुजा सिमेंट्स    ४.४०% एसीसी    ४.१६%

टॅग्स :अदानी