Join us

आता कपड्यांची धुलाईसुद्धा महागणार, बड्या कंपनीने डिटर्जंट आणि बारच्या किमतीत केली मोठी वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:35 IST

Soaps & Detergents price Hikes : सर्वसामान्य लोक महागाईने होरपळून निघत असतानाच त्यांना महागाईचा अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. भाजीपाल्यापासून ते गॅस सिलेंडरपर्यंत अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत. दरम्यान, सर्वसामान्य लोक महागाईने होरपळून निघत असतानाच त्यांना महागाईचा अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एफएमसीजी सेक्टरमधील दिग्गज कंपनी असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरने डिटर्जंट आणि बारच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. कंपनीने डिटर्जंट आणि बारच्या किमती कमाल १७ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत.

गेल्या पाच महिन्यांमध्ये कंपनीने चार वेळा उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. यादरम्यान, किमतीमध्ये २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. कच्च्या मालाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे ही भाववाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, या कंपनीने याच आठवड्यामध्ये चहा आणि कॉफीच्या किमतीमध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यामध्येसुद्धा साबण आणि डिटर्जंटच्या किमती वाढवल्या होत्या. एचयूएलने याच आठवड्यात ब्रू कॉफीची किंमत ३ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.

या महिन्याच्या सुरुवातीलाच दुधाच्या दरात वाढ झाली होती. सर्वप्रथम अमूल त्यानंतर पराग आणि मदर डेअरीनेदेखील दुधाचा दर हा प्रति लीटर दोन रुपयांनी वाढवला. त्यामुळे सर्वसामान्यांना आता दूध विकत घेताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.  सरकारने फेब्रुवारी महिन्याची घाऊक महागाईची आकडेवारी सोमवारी जाहीर केली. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किमतीवर आधारित महागाई दर गेल्या महिन्यात १३.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाई सलग ११व्या महिन्यात वाढल्याने सर्वसामान्यांना याचा धक्का बसला आहे. 

टॅग्स :महागाईभारतअर्थव्यवस्था