Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे भारतीयांचे बिघडले मासिक बजेट; जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा तेव्हा भारताला मोजावी लागते मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 07:17 IST

औषधे, पेंट, हॉटेलिंग महाग

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२० डॉलर्सपर्यंत पोहोचून पुन्हा ते १०० डॉलर्स प्रति बॅरलवर आले आहेत. जर होर्मुझची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहिली तर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. याचा परिणाम केवळ सरकारच्या तिजोरीवरच नाही, तर सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावरही होईल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे रुपया आणखी घसरण्याची अपेक्षा आहे. यामुळे देशात महागाई वाढली असून, देशाच्या जीडीपीमध्ये मंदी येण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात जेट इंधनाच्या (एटीएफ) किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याने विमान कंपन्यांच्या खर्चात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार वाढवला आहे. यामुळे विमान प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

१०% वाढ तेल किमतीत  झाल्यास जीडीपी वाढीमध्ये २०-२५ बेसिस पॉइंट्सची घट होऊ शकते.

९० डॉलर प्रति बॅरलवर कच्च्या तेलाचे दर राहिले तर किरकोळ महागाई ०.८% ने वाढण्याची अपेक्षा आहे, असे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.

१० डॉलर्स प्रति बॅरल इतकी वाढ कच्च्या तेलाच्या किमतीत झाली तर चालू खात्यातील तूट १८-२० अब्ज डॉलर्सने वाढू शकते.

औषधांच्या किमती ३० टक्क्यांनी वाढणार

गेल्या दोन आठवड्यांत, औषध निर्मितीमध्ये वापरला जाणारा कच्चा माल म्हणजेच एपीआयच्या किमती ३०% पर्यंत वाढल्या आहेत. जर हीच स्थिती चालू राहिली तर भविष्यात भारतातील औषधांच्या किमती आणखी वाढतील. युद्धामुळे कंटेनर जहाजांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

पुढील महिन्यात रंग महाग होणार; २ ते ५% किंमत वाढेल

जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर एप्रिलपासून भारतात रंगाच्या किमती २ ते ५% वाढू शकतात. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर रंग कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागू शकतात, अशी भीती डीलर्सना आहे. कंपन्या किमतींवर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत वाट पाहू शकतात.

बाहेर खाणे ३०% पर्यंत महाग होणार?; खर्च ग्राहकांवर

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने बाहेर खाणे महाग होऊ शकते. रेस्टॉरंट्स हा खर्च ग्राहकांवर लादू शकतात. मात्र, सध्या ते त्यांचे स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेचा सामना करत आहेत. अनेक रेस्टॉरंट्स किमती २० ते ३०% वाढविण्याची तयारी करीत आहेत.

मालवाहतूक खर्च वाढणार; सिलिंडर न मिळाल्याने फटका

भारत आपल्या गरजेच्या ८५% पेक्षा जास्त क्रूड ऑइल आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढेल, यामुळे अनेक वस्तूंच्या किमती वाढतील. यामुळे महागाईत आणखी वाढ होऊ शकते. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६० रुपयांनी वाढली. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे अन्नासह अनेक व्यवसायांवर परिणाम होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War hits Indian budgets: Rising oil prices trigger economic woes.

Web Summary : Rising crude oil prices due to global conflicts are disrupting Indian household budgets. Increased fuel costs are hiking airfares, potentially raising restaurant bills, medicine prices, and paint costs while also impacting GDP and causing inflation.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरभारत