PF Withdrawal: जर तुम्ही भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) पैसे काढण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीच्या कोणत्या चुकीमुळे तुमचा पीएफ क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला हवं असलं तरी तुम्ही तुमचे पैसे काढू शकणार नाही. ही चूक वेळीच कशी पकडता येईल आणि त्यानंतरचा त्रास कसा टाळता येईल? चला तर मग जाणून घेऊया कंपनीच्या कोणत्या चुकीमुळे तुमचा पीएफ क्लेम फेटाळला जाऊ शकतो.
कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्यावतीने दर महिन्याला पीएफमध्ये ठराविक रक्कम जमा केली जाते. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपर्यंत कंपनीला ही रक्कम जमा करावी लागते. पण अनेकदा कंपन्या उशीरा योगदान देतात किंवा विसरतात. असे मिसिंग किंवा डिलेड झालेलं योगदान पीएफ क्लेम नाकारण्याचं एक प्रमुख कारण बनू शकतं. ही समस्या टाळण्यासाठी पीएफचा दावा करण्यापूर्वी कंपनीकडून दर महिन्याला तुमच्या पीएफ खात्यात रक्कम जमा होत आहे की नाही हे तपासून घ्या. हे काम तुम्ही अगदी सहजपणे करू शकता.
ईपीएफओ पोर्टलद्वारे कसं तपासावं
- सर्वप्रथम epfindia.gov.in जाऊन ‘For Employees' सेक्शनमधील ‘Member Passbook’वर क्लिक करा.
- UAN, पासवर्ड आणि कॅप्चा भरा, त्यानंतर ओटीपी एन्टर करा आणि लॉगिन करा.
- तुमचे पीएफ ई-पासबुक स्क्रीनवर दिसेल. कंपनीने पीएफमध्ये योगदान दिले आहे की नाही हे तुम्ही पाहू शकाल.
उमंग अॅपद्वारे कसं पाहाल
- अॅपवर लॉगिन करा आणि 'EPFO' सेक्शनमध्ये जा.
- View Passbook क्लिक करा. यूएएन एन्टर करा, ओटीपी भरा आणि पासबुक पहा.
- जर तुमच्याकडे तुमच्या यूएएनशी आधार लिंक असेल आणि ईपीएफओमध्ये अॅक्टिव्ह असेल तर तुम्ही बॅलन्स आणि योगदानाची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
कंपनीच्या वतीनं पीएफ खात्यात पैसे जमा होत नसल्यास आपल्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याला कळवा. पीएफ पासबुकच्या स्क्रीनशॉटसह कंपनीला माहिती द्या. जर कंपनीनं चूक मान्य केली तर ती ईपीएफओला स्पष्टीकरण पत्र पाठवू शकते. तसं न केल्यास तुम्ही तक्रार दाखल करू शकता.