Join us

विजय मल्ल्याची लंडनच्या घरातून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:12 IST

२०६ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी बँकेकडून निवासस्थानाची विक्री केली जाणार आहे.

नवी दिल्ली : बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून ब्रिटनला पळालेला कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याला आपले ब्रिटनमधील निवासस्थान एका स्वीस बँकेसोबतच्या कायदेशीर लढाईत गमवावे लागले आहे. २०६ कोटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यासाठी बँकेकडून या निवासस्थानाची विक्री केली जाणार आहे.स्वीत्झर्लंडच्या यूबीएस बँकेचे २०६ कोटी रुपये विजय मल्ल्या यांच्याकडे थकले आहेत. त्याच्या वसुलीसाठी विजय मल्ल्या यांचे लंडनच्या रिजंट पार्कमधील १८/१९ कॉर्नवॉल टेरेसस्थित लक्झरी अपार्टमेंट विकण्याचा बँकेचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला. आभासी सुनावणीत ब्रिटिश उच्च न्यायालयाचे डेप्युटी मास्टर मॅथ्यू मार्श यांनी मल्ल्या यांना थकबाकी भरण्यासाठी आणखी वेळ देण्यास नकार दिला. त्यामुळे बँक हे घर आता विकू शकते. हे प्रकरण रॉस कॅपिटल व्हेंचर्सशी संबंधित आहे. मल्ल्या यांनी कर्ज न भरल्याने त्यांना नोटीस देण्यात आली होती.

टॅग्स :विजय मल्ल्या