Vijay Mallya Birthday Party: आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपांमुळे भारतातून फरार असलेला व्यावसायिक विजय माल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण कोणतीही न्यायालयीन सुनावणी नसून, लंडनमध्ये त्याच्यासाठी आयोजित करण्यात आलेली एक अत्यंत हाय-प्रोफाइल आणि ग्लॅमरस पार्टी आहे. आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी यानं लंडनच्या बेलग्रेव्ह स्क्वेअरमधील त्याच्या आलिशान घरी या 'प्री-बर्थडे' सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं. या सेलिब्रेशनचे फोटो आणि निमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
विजय मल्ल्याच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याची थीम ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अशी ठेवण्यात आली होती. या पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यावर मल्ल्याचं कार्टून शैलीतील छायाचित्र असून "रीमा (बौरी) आणि ललित तुम्हाला प्रिय मित्र विजय माल्ल्यासाठी एका ग्लॅमरस संध्याकाळसाठी आमंत्रित करत आहेत," असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या ओळीने सोशल मीडियावर टीका आणि चर्चेला उधाण आलं आहे.
कोणी लावलेली हजेरी?
या कार्यक्रमात केवळ ललित मोदी आणि विजय मल्ल्याच नव्हते, तर अनेक नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती. यामध्ये हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इद्रिस एल्बा, नामांकित फॅशन डिझायनर मनोविराज खोसला आणि बायोकॉनच्या संस्थापिका किरण मजूमदार-शॉ यांचा समावेश होता. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये किरण मजूमदार-शॉ कधी इद्रिस एल्बा यांच्याशी संवाद साधताना, तर कधी मनोविराज खोसला यांच्यासोबत पोज देताना दिसून येत आहेत.
या कार्यक्रमाचे फोटो फोटोग्राफर जिम रिडेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या एकत्र दिसत आहेत. रिडेल यांनी आपल्या पोस्टमध्ये ललित मोदीचे आभार मानत, त्याच्या लंडनमधील घरी विजय मल्ल्यासाठी शानदार पार्टी दिल्याचे नमूद केले. स्वतः ललित मोदीनेही ही पोस्ट रिट्विट करत पार्टीला दुजोरा दिला असून पाहुण्यांचे आभार मानलेत.
विशेष म्हणजे, ललित मोदी आपल्या अशाच भव्य आयोजनांसाठी नेहमीच चर्चेत असतो. काही काळापूर्वी त्याने लंडनच्या 'मॅडॉक्स क्लब'मध्ये आपला ६३ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता, ज्यामध्ये विजय मल्ल्यासह त्याचे अनेक मित्र सहभागी झाले होते.
Web Summary : Vijay Mallya, accused of financial crimes, celebrated his 70th birthday with a lavish party hosted by Lalit Modi in London. The 'King of Good Times' themed party saw attendance from celebrities like Idris Elba and Kiran Mazumdar-Shaw, sparking social media buzz.
Web Summary : वित्तीय अपराधों के आरोपी विजय माल्या ने लंदन में ललित मोदी द्वारा आयोजित भव्य पार्टी में अपना 70वां जन्मदिन मनाया। 'किंग ऑफ गुड टाइम्स' थीम वाली पार्टी में इदरिस एल्बा और किरण मजूमदार-शॉ जैसी हस्तियों ने भाग लिया, जिससे सोशल मीडिया पर चर्चा हुई।