नवी दिल्ली : जुलैमध्ये भारतातील वाहन विक्रीत १८.७१ टक्के घसरण झाली असून, ही मागील १९ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. वाहन उद्योगातील संघटना ‘सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन महिन्यांत १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत.सियामने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये सर्व श्रेणीतील १८,२५,१४८ वाहने विकली गेली. २0१८च्या जुलैमध्ये २२,४५,२२३ वाहनांची विक्री झाली होती. या आधीची सर्वांत मोठी २१.८१ टक्क्यांची घसरण डिसेंबर, २000 मध्ये नोंदली गेली होती.प्रवासी वाहनांची विक्री तब्बल ३0.९८ टक्क्यांनी घसरली असून, हीसुद्धा मागील १९ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. यंदाच्या जुलैमध्ये २,00,७९0 प्रवासी वाहने विकली गेली. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये हा आकडा २,९0,९३१ होता. डिसेंबर, २000 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री ३५.२२ टक्क्यांनी घसरली होती. याशिवाय जुलैमध्ये सलग नवव्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री घटली आहे.प्रवासी कारच्या विक्रीतही १९ वर्षांतील सर्वाधिक ३९.८६ टक्के घसरण झाली आहे. देशांतर्गत कार विक्री ३५.९५ टक्क्यांनी घसरून १,२२,९५६ कारवर आली. जुलै, २0१८ मध्ये १,९१,९७९ कार विकल्या गेल्या होत्या. दुचाकी वाहनांतील विक्रीत १६.८२ टक्क्यांची घसरण झाली आहे. जुलैमध्ये १५,११,६९२ दुचाकी विकल्या गेल्या. मागच्या वर्षीच्या जुलैमध्ये हा आकडा १८,१७,४0६ होता. व्यावसायिक वाहनांची विक्री २५.७१ टक्क्यांनी घसरून ५६,८६६ वाहनांवर आली. जुलै, २0१८ मध्ये हा आकडा ७६,५४५ होता.सियामचे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले की, विक्री वाढविण्यासाठी उद्योग सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. तथापि, त्याचा उपयोग होताना दिसत नाही. वाहन उद्योगास आता सरकारच्या साह्याची गरज आहे, असे मला वाटते.
वाहनविक्री क्षेत्रात १९ वर्षांतील मोठी घसरण, १५ हजार बेरोजगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 04:38 IST