Join us

अदानींना भिडणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा बाजार उठला; मालकानं कंपनी बंदची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 08:58 IST

आम्ही काही साम्राज्यांना हादरवून टाकले ज्यांना हादरवून टाकण्याची गरज होती, ज्यात अब्जाधीशांचा समावेश होता असंही एंडरसन यांनी म्हटलं. 

न्यूयॉर्क - अदानी ग्रुपविरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एक्स'वर त्यांनी याबाबतची घोषणा करत त्यांच्या आयुष्यातील प्रवास, संघर्ष आणि यश यावर भाष्य केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत, मित्रांसमावेत आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतला आहे. आम्ही जो विचार केला होता ते पूर्ण झाल्यावर हे बंद करायचं होते. अखेर आज तो दिवस उजाडला असं सांगत त्यांनी कंपनी बंद करण्याचं घोषित केले.

एंडरसन (Nate Anderson) यांनी त्यांच्या संघर्षाचे दिवस आठवताना म्हटलंय की, मी जो मार्ग निवडला होता तो सोपा नव्हता याची मला जाणीव नव्हती, मी जोखीम घ्यायला तयार होतो. जेव्हा मी याची सुरुवात केली तेव्हा मी खरेच सक्षम आहे का याची मला शंका होती. कारण माझ्याकडे कुठलाही अनुभव नव्हता. माझं कोणी नातेवाईक या क्षेत्रात नव्हते. मी सरकारी शाळेत शिकलो होतो. मी गोल्फ खेळत नव्हतो. मी सूपरह्युमन नव्हतो जो ४ तासाची झोप घेऊन काम करू शकत होतो असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय मी माझ्या बहुतेक नोकऱ्यांमध्ये चांगला कर्मचारी होतो, पण बऱ्याचदा माझ्याकडे दुर्लक्ष केले जायचे. जेव्हा मी हे काम सुरू केले तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी कंपनीतून बाहेर पडताच माझ्यावर ३ खटले भरले गेले त्यात माझ्याकडे असलेले उरलेले पैसेही संपले. जर मला जागतिक दर्जाचे व्हिसलब्लोअर वकील ब्रायन वूड यांचा पाठिंबा मिळाला नसता, ज्यांनी माझ्याकडे आर्थिक क्षमता नसतानाही माझी केस लढवली तर मी सुरुवातीच्या टप्प्यातच अपयशी ठरलो असतो. माझं एक मुल होते, त्यावेळी मला घराबाहेर काढण्याचा सामना करावा लागला असता. मी घाबरलो होतो, पण जर मी शांत बसलो तर मोडून जाईन हे मला माहित होते. माझ्याकडे एकमेव पर्याय होता तो म्हणजे पुढे जात राहणे असंही एंडरसन यांनी सांगितले. 

आम्ही आमच्या कामानं काही साम्राज्य हलवलं

हिंडेनबर्ग रिसर्च सुरू करताना आम्ही सर्वांनी अचूकतेवर लक्ष केंद्रित करत पुराव्यांवर आधारित भाष्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. कधीकधी याचा अर्थ असा होतो की मोठे संकट ओढावून घेण्यासारखे होते. आमची लढाई आमच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तींशी होती. फसवणूक, भ्रष्टाचार आणि नकारात्मकता अनेकदा जबरदस्त वाटते. सुरुवातीला न्यायाची भावना सहसा अशक्य होती, परंतु जेव्हा ती घडली तेव्हा ती अत्यंत समाधानकारक होती. शेवटी, आम्ही आमच्या कामाचा प्रभाव पाडला. मी सुरुवातीला विचार केला होता त्यापेक्षा खूपच जास्त. आमच्या कामाच्या माध्यमातून नियामकांनी जवळजवळ १०० व्यक्तींना दिवाणी किंवा फौजदारी खटल्यात आणले आहे. आम्ही काही साम्राज्यांना हादरवून टाकले ज्यांना हादरवून टाकण्याची गरज होती, ज्यात अब्जाधीशांचा समावेश होता असंही एंडरसन यांनी म्हटलं. 

अदानी समुह आणि सेबीवर केले होते गंभीर आरोप

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने जानेवारी २०२३ मध्ये समूहावर कॉर्पोरेट गैरव्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे भारतीय उद्योग जगतात खळबळ माजली होती. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं होतं. 

टॅग्स :गौतम अदानीसेबी