Join us

रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 08:47 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडू तेल खरेदीसाठी फक्त भारताला लक्ष्य करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात कर लादण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या ८ तासांतच त्यांनी हे विधान केले. दुसरीकडे, अमेरिकेचा दुटप्पीपणा जगासमोर आलेला आहे. अमेरिका रशियासोबत व्यवसाय करत असली तरी भारताने त्यांच्यासोबत व्यवसाय केलेला त्यांना पटत नाहीये. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीसाठी फक्त भारताला लक्ष्य करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यास असमर्थ ठरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉरचा खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादला आहे. नवीन घोषणेनंतर, भारतावरील एकूण टॅरिफ आता ५० टक्के झाला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे यापेक्षाही मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या एका विधानावरुन ते एवढ्यावरच थांबणार आहेत असे वाटत नाही. ट्रम्प आणखी काही निर्बंध लादू शकतात, ज्याचे संकेत त्यांनी स्वतःहून दिले होते.

चीनसारखे इतर देशही रशियन तेल आयात करतात तेव्हा भारतावर अतिरिक्त शुल्क का लादले गेले असा सवाल एका पत्रकाराने विचारला. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक उत्तर दिलं. "आता फक्त ८ तास झाले आहेत. बघूया काय होते ते. तुम्हाला थोड्याच वेळात खूप काही दिसेल... तुम्हाला खूप दुय्यम निर्बंध दिसतील," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. यासोबत जर रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार झाला तर ते भारतावर लादलेले शुल्क रद्द करतील का? असं विचारलं असता ट्रम्प यांनी, 'आपण तेव्हाचे तेव्हा पाहू. पण सध्या भारत ५० टक्के शुल्क भरेल,' असं विधान केलं.

आम्ही भारतावर ५०% कर लादला आहे, जो रशियन तेल खरेदी करण्यात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. आम्ही भारतासोबत हे केले आहे. इतर अनेक देशांमध्येही हे लागू केले आहे. त्यापैकी एक चीन असू शकतो," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. भारताने रशियन तेल खरेदी थांबवण्यास नकार देणे हे अमेरिकेसाठी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे सांगण्यात आलं आहे. युक्रेनविरुद्ध रशियाला भारत निधी देत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी २५ टक्के कर लादला होता. तो ७ ऑगस्टपासून लागू होईल. बुधवारी लागू केलेला २५ टक्के कर २१ दिवसांनी लागू होईल.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्परशियाभारत