Join us  

अमेरिकेचे इराणवर कठोर निर्बंध, भारतात तेलाचे दर भडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 5:51 PM

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत. तेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत.

नवी दिल्ली  - सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत. तेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणवर लादलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होणार असल्याने तेलाच्या किमतींचा भडका उडण्याची शक्यता आहे. या निर्बंधांमुळे उदभवणाऱ्या प्रश्नांबाबत भारताने आपले मत स्पष्ट केले आहे. या निर्बंधांमुळे तेलाचा तुटवडा जाणवणार नाही. मात्र तेलाचा एक मोठा पुरवठादार गमावण्याच्या भीतीमुळे तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. तसेच या किमतींमध्ये पुढेही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या तेल उत्पादकावर बंदी घातल्याने बाजारातील वातावरणही खराब झाले आहे. यावेळी इराणकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने घातलेल्या निर्बंधातून सूट मागण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी टाळले. तसेच या संदर्भात देशाचे काय मत आहे हे आम्ही स्पष्ट केले आहे. आता यावर अधिक काही बोलायचे नाही, असे ते म्हणाले. दोन सरकारी तेलशुद्धीकरण प्रकल्पांनी नोव्हेंबर महिन्यासाठी इराणकडून 1.25 दशलक्ष टन कच्च्या तेलाची मागणी नोंदवली आहे, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी मे महिन्यामध्ये इराणसोबत झालेला अणुकरार रद्द केला होता. तसेच इराणवर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली होती. त्यापैकी काही निर्बंध 6 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. तर तेल आणि बँकिंग व्यवहारांसदर्भातील निर्बंध 4 नोव्हेंबरपासून लागू होतील. त्यानंतर इराणकडून तेल खरेदी केल्यास त्याची रक्कम डॉलरमध्ये देण्यात अडचणी निर्माण होणार आहेत.  

टॅग्स :खनिज तेलइराणअमेरिकाभारतपेट्रोल