UPI New Rule: जर तुम्ही मोबाईल फोनवरील अॅपच्या माध्यमातून एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत असाल किंवा कोणत्याही वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे देत असाल, तसंच इतर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पेमेंट अॅपचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) आजपासून आपल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये (UPI) महत्त्वपूर्ण बदल केलेत. या यूपीआयच्या माध्यमातून फायनान्शियल अॅपवरून पेमेंट केले जाते. हे बदल आजपासून देशभरात लागू झालेत.
काय झालाय बदल?
जर तुम्हाला एखाद्याचा फोन आला की मला पैसे पाठव, तर अशा वेळी तुमच्या मनात एक प्रश्न येतो की आपल्या अकाऊंटमध्ये पैसे आहेत की नाहीत? त्यावेळी तुम्ही अकाऊंट ओपन करता आणि बॅलन्स चेक करता. असं तुम्ही अनेकदा करत असाल. यावर कोणतेही निर्बंध नव्हते. पण आजपासून तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त ५० वेळाच बॅलन्स चेक करू शकाल. एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या बँक खात्याची लिस्टही दिवसातून फक्त २५ वेळा पाहू शकाल. असं म्हटलं जातं की, काही ग्राहक दिवसा केवळ स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी यूपीआयमधून बॅलन्स तपासत असत. यामुळे यंत्रणेवरही कंजेशनची समस्या निर्माण होत होती. म्हणूनच त्यात बदल केला जात आहे.
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
ऑटोपे व्यवहाराची वेळ
ऑटोपेबाबतही एक महत्त्वाचा बदल झाला आहे. तुमचे EMI, SIP आणि OTT सबस्क्रिप्शन सारखे UPI ऑटोपे व्यवहार आता फक्त नॉन-पीक अवर्समध्येच प्रोसेस केले जातील. या वेळा आहेत: सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आणि रात्री ९:३० नंतर. याचा अर्थ असा की जर तुमचं नेटफ्लिक्सचं बिल सकाळी ११ वाजता कापलं जात होते, तर आता ते लवकर किंवा नंतर कापलं जाऊ शकतं. म्हणून, पेमेंट फेल होऊ नये म्हणून एक रिमाइंडर सेट करा.
ट्रान्झॅक्शन फेल
आणखी एक बदल ट्रान्झॅक्शन फेलबाबत आहे. जर तुमचे UPI पेमेंट अयशस्वी झालं, तर तुम्हाला त्याची स्थिती तपासण्यासाठी फक्त ३ संधी मिळतील. प्रत्येक प्रयत्नादरम्यान तुम्हाला ९० सेकंद थांबावं लागेल. सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
रिसिव्हरचं नाव दिसेल
आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता तुम्हाला पैसे पाठवताना नेहमी रिसिव्हरचं नाव दिसेल. यामुळे चुकीचं पेमेंट टाळण्यास मदत होईल. हा फसवणुकीविरोधात एक अतिशय चांगला उपाय आहे. याचा अर्थ असा की आता तुम्हाला पेमेंट करताना अधिक काळजी घेण्याची संधी मिळेल.