Join us

UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 04:59 IST

UPI server down in India: आर्थिक व्यवहारासाठी यूपीआयचा वापर करताना अडथळे येत असल्याच्या तक्रारी शनिवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून येण्यास सुरुवात झाली. त्याबद्दल एनपीसीआयने खुलासा केला.

नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंटसाठी वापरली जाणारी यूपीआय प्रणाली शनिवारी पुन्हा एकदा ठप्प झाली. त्यामुळे वापरकर्त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. यूपीआय ठप्प होण्याची ही मागील १८ दिवसांतील तिसरी वेळ आहे. तांत्रिक बिघाडामुळे यूपीआय प्रणाली बंद पडल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बिघाड निगराणी मंच ‘डाऊनडिटेक्टर’ने दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय ठप्प झाल्याच्या तक्रारी शनिवारी सकाळी ११:३० वाजल्यापासून येण्यास सुरुवात झाली. 

यासंदर्भात स्पष्टीकरण देताना ‘एनपीसीआय’ने ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘यूपीआयचा वापर करताना मध्ये मध्ये तांत्रिक समस्यांचा सामना वापरकर्त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे यूपीआय देवाणघेवाणीवर अंशत: परिणाम झाला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तांत्रिक पथके काम करत आहेत. यामुळे निर्माण झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’

यापूर्वी असे कधी झाले? 

यापूर्वी २६ मार्च आणि २ एप्रिल त्यानंतर १२ एप्रिल म्हणजे १८ दिवसांत तीनवेळा यूपीआय प्रणाली ठप्प झाली.

मार्चमध्ये कोटींचे व्यवहार  

यंदा मार्चमध्ये यूपीआयवरील व्यवहार २४.७७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आदल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा १२.७ टक्के अधिक आहे. फेब्रुवारीत २१.९६ लाख कोटींचे व्यवहार झाले होते.

काय आहे यूपीआय?

‘यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (यूपीआय) ही एक त्वरित पैसे अदा करणारी डिजिटल प्रणाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निगराणीखालील ‘एनपीसीआय’ने ही प्रणाली विकसित केली आहे. 

...अन् व्हॉट्सॲपही अचानक पडले बंद

शनिवारी सायंकाळी व्हॉट्सॲप हे मेसेजिंग अ‍ॅपदेखील अचानक बंद पडल्याने ग्रुपवर मेसेज पाठविणे, स्टेटस अपलोड करणे आणि अ‍ॅप उघडण्यात अडचणी येऊ लागल्या. 

यासंदर्भात ‘डाऊनडिटेक्टर’च्या माहितीनुसार, किमान ८१ टक्के लोकांनी मेसेज पाठवण्यासंदर्भात समस्या नोंदविल्या. १६ टक्के वापरकर्त्यांनी एकूण ॲपच्या अनुभवाबद्दल तक्रार केली.  

याआधी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसही व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवेत व्यत्यय आला होता. ज्यामुळे अनेकांना अ‍ॅप योग्यरीत्या वापरता येत नव्हते. 

वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप किंवा व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कनेक्ट होण्यास किंवा कॉल्स करण्यास अडचणी येत होत्या. 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकपैसा