Join us

आणखी एक IPO येणार; शाहरुख, अमिताभ यांच्यासह दिग्गज सेलिब्रिटींचीही गुंतवणूक, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:17 IST

Sri Lotus Developers and Realty IPO: या आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन इश्यूचा समावेश आहे, ज्यात विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही. यामध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गुंतवणूक आहे.

Sri Lotus Developers and Realty IPO: प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची गुंतवणूक असलेल्या मुंबईतील श्री लोटस डेव्हलपर्स अँड रियल्टीनं आयपीओच्या माध्यमातून ७९२ कोटी रुपये उभे करणार आहे. यासाठी त्यांनी भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत. या आयपीओमध्ये पूर्णपणे नवीन इश्यूचा समावेश आहे, ज्यात विक्रीसाठी कोणतीही ऑफर नाही.

काय आहे अधिक माहिती?

लोटस डेव्हलपर्समध्ये प्रवर्तकांची ९१.७८ टक्के हिस्सा असून उर्वरित ८.२२ टक्के हिस्सा बॉलिवूड स्टार्स, आशिष कचोलिया, एनएव्ही कॅपिटल, डोव्हेटेल ग्लोबल फंड, मिनर्व्हा व्हेंचर्स, ऑपबास्केट सह १५० सार्वजनिक भागधारकांकडे आहे. यावर्षी १६ सप्टेंबर रोजी कंपनीनं खासगी प्लेसमेंटच्या माध्यमातून १३९.४ कोटी रुपये उभे केले. कंपनीने मनी स्पिनर्स, सेरा इन्व्हेस्टमेंट्स, स्मार्ट अल्गो सोल्युशन्स, एनएव्ही कॅपिटल, डोव्हेटेल ग्लोबल फंड, मिनर्व्हा वेंचर्स, यंत्र ई-सोलर इंडिया आणि ऑपबास्केट सह ३७ गुंतवणूकदारांना ३०० रुपये प्रति शेअर दराने ४६.४६ लाख इक्विटी शेअर्स जारी केले आहेत.

याव्यतिरिक्त, यावर्षी १४ डिसेंबर रोजी कंपनीने १५० रुपये प्रति शेअर (पहिल्या खाजगी प्लेसमेंटच्या अर्ध्या किंमतीच्या) दरानं २.६६ कोटी इक्विटी शेअर्सच्या आणखी एका खाजगी प्लेसमेंटद्वारे ३९९.२ कोटी रुपये उभे केले. आशिष कचोलिया, अबुंदिया कॅपिटल, अॅस्टरन कॅपिटल, एएआरआयआय व्हेंचर्स, टॉपगेन फायनान्स, टर्टल क्रेस्ट, अमिनीती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, डीआरचोक्सी फिनसर्व्ह आणि जगदीश एन मास्टर अँड नर्चर प्रणय फाऊंडेशन या खासगी प्लेसमेंटमध्ये एकूण ११८ गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप करण्यात आलं.

आशिष कचोलियांची मोठी गुंतवणूक

आशिष कचोलिया यांनी ३३.३३ लाख शेअर्ससाठी कंपनीत सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. शाहरुख फॅमिली ट्रस्ट, अमिताभ बच्चन, एकता कपूर, तुषार कपूर, जितेंद्र उर्फ रवी अमरनाथ कपूर, टायगर जॅकी श्रॉफ, राजकुमार यादव, राकेश रोशन, हृतिक राकेश रोशन, साजिद सुलेमान नाडियाडवाला आणि मनोज बाजपेयी या चित्रपटसृष्टीतील नामांकितांनीही लोटस डेव्हलपर्समधील १९.२८ लाख शेअर्स २८.९२ कोटी रुपयांना खरेदी केले आहेत.

कंपनीबद्दल माहिती

मुंबईत काम करणाऱ्या रिअल इस्टेट डेव्हलपरनं पश्चिम उपनगरातील अल्ट्रा लक्झरी सेगमेंट आणि लक्झरी सेगमेंटमधील पुनर्विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं आहे. नोव्हेंबर २०२४ पर्यंत कंपनीनं तीन प्रकल्प पूर्ण केले आहेत, तर सहा चालू प्रकल्प आणि सात आगामी प्रकल्प आहेत, ज्याचं अंदाजित विकास क्षेत्र अनुक्रमे १.०५ दशलक्ष आणि ४.५ दशलक्ष चौरस फूट आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक