Join us

36 महत्वाची औषधे टॅक्स फ्री होणार, अनेक औषधांवरील कस्टम ड्यूटी हटवली जाणार; बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी काय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:07 IST

Union Budget 2025 : आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी 36 महत्वाची औषधे पूर्णपणे टॅक्स फ्री करण्यासंदर्भात घोषणा केली...

मोदी सरकार ३.० चा पहिला पूर्णकालीन सर्वसाधारण अर्थसंकल्प आज सादर झाला. आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. खरे तर, स्वतंत्र भारतातील त्या सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सीतारमण यांनी 36 महत्वाची औषधे पूर्णपणे टॅक्स फ्री करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. 

दुर्मिळ आजारांनी ग्रस्त लोकांसाठी आवश्यक औषधी पूर्णपणे कस्टम फ्री केली जाणार असल्याचे सीतारमण यांनीम म्हटले आहे. यासंदर्भात सविस्तर बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, "३६ जीवनरक्षक औषधांवरील सीमाशुल्क पूर्णपणे रद्द केले जाईल. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे केअर सेंटर तयार केले जातील. कॅन्सरच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधी स्वस्त होतील. तसेच, ६ जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५% पर्यंत कमी केली जाईल."

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जाणार -याशिवाय, "शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी एक चांगली संस्था निर्माण केली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १० हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जाणार आहेत. ५ वर्षांमध्ये ७५ हजार जागा वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर्स स्थापन केली जाणार आहेत. २०२५-२६ या वर्षात अशी २०० केंद्रे उभारण्याचे उद्दीष्ट असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली. 

आरोग्य, कृषी आणि इनोव्हेशनमध्ये AIचा वापर -सीतारमण म्हणाल्या, "बिहारमध्ये फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट इन्स्टिट्युट सुरू केले जाणार आहे. याशिवाय देशात एआयच्या अभ्यासाठी तीन केंद्र उभारली जातील. आरोग्य, कृषी आणि इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करण्यात येणार आहे." 

टॅग्स :अर्थसंकल्प २०२५निर्मला सीतारामनभाजपासंसदकर्करोगहॉस्पिटल