Join us

Union Budget 2022 Nirmala Sitharaman : २०२२-२३ या वर्षांत चिप असलेले पासपोर्ट दिले जाणार, ५ जी सेवाही याच वर्षी - अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:02 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

Union Budget 2022 Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. २०२२-२३ या वर्षांमध्ये चिप असलेले पासपोर्ट दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय याच वर्षी ५ जी स्पेक्ट्रमचाही लिलाव करण्यात येणार असल्याचं त्या म्हणाल्या.

देशात आता ई पासपोर्टची सुविधा सुरू केली जाणार आहे. २०२२-२३ या वर्षात चिप असलेले पासपोर्ट देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. याशिवाय कंपन्या बंद करण्याची योजना ज्यामध्ये आता दोन वर्षांचा कालावधी लागतो तो कमी करून ६ महिने केला जाणार आहे. पारदर्शकपणा वाढवण्यासाठी आणि कामाला लागणारा विलंब कमी करण्यासाठी ऑनलाइन ई बिल सिस्टम सर्व केंद्रीय मंत्रालयांमध्ये खरेदीसाठी लागू केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या सिस्टमच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्टर्स आणि पुरवठादार यांना डिजिटल बिल मिळणार आहे. बँक गॅरंटीच्या जागी शोरिटी बाँड सरकारी खरेदीच्या प्रकरणात स्वीकारले जातील, असंही यावेळी सांगण्यात आलं. 

५ जी सेवांच्या लाँचसाठी एक स्कीम आणली जाणार आहे. तसंच सर्व गावातील लोकांपर्यंत इंटरनेटची सेवा पोहोचली पाहिजे, असंही यावेळी सांगण्यात आलं. देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागांसाठी बँक आणि मोबाईल आधारित सुविधांसाठी सेवा वाटप निधी प्रदान केला जाईल. देशातील सर्व गाव आणि तेथे राहणारे लोक डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतील, ही सरकारची दृष्टी आहे. यासाठी एक राष्ट्र एक नोंदणी धोरण लागू केले जाईल. खेड्यापाड्यात ब्रॉडबँड सेवेला चालना दिली जाईल, असंही अर्थमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.

टॅग्स :अर्थसंकल्प 2022निर्मला सीतारामनपासपोर्टतंत्रज्ञान