Join us

Russia-Ukraine Crisis: शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 20:46 IST

Russia-Ukraine Crisis: फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे.

नवी दिल्ली: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांना मोठा झटका बसला आहे. या दोन देशांमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. शेअर बाजार सलग सातव्या व्यवहारी दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. केवळ आजच्या घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारच्या व्यापारात BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 242.28 लाख कोटी रुपये होते. एक दिवस आधी हा आकडा 255.68 लाख कोटी रुपये होता. म्हणजेच केवळ एका दिवसाच्या व्यवसायात गुंतवणूकदारांचे 13.32 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28.33 लाख कोटी रुपये बुडालेफेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28 लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. BSE चे बाजार भांडवल 2 फेब्रुवारी रोजी 2,70,64,905.75 कोटी रुपये होते, जे आता 2,42,31,379.20 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे 28.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला, निफ्टी 16250 च्या खाली बंद झालागुरुवारी, 23 मार्च 2020 नंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. व्यवहाराच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 2702.15 अंक किंवा 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 815.30 अंकांनी म्हणजेच 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला. गुरुवारच्या व्यवहारात टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, यूपीएल, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्सला निफ्टीचा सर्वाधिक फटका बसला. BSE मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक 5 टक्क्यांनी घसरला आहे.

टॅग्स :युक्रेन आणि रशियाव्यवसायशेअर बाजार