Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG नं भरलेली दोन मोठी जहाजं भारताकडे रवाना; हार्मुजची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी मिळाला 'ग्रीन सिग्नल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:36 IST

LPG Ships India: स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई आणि पुरवठा खंडित होण्याच्या भीतीच्या वातावरणात एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे.

LPG Ships India: स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई आणि पुरवठा खंडित होण्याच्या भीतीच्या वातावरणात एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षामुळे पर्शियन आखातात (Persian Gulf) अडकलेली दोन भारतीय जहाजे, ‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’, आता सुरक्षितपणे हार्मुजची सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) पुढे येण्याच्या तयारीत आहेत. सीएनएन-न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर ही जहाजं रवाना झाली आहेत.

भारतीय नौदलाचे प्रयत्न

भारतीय नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात प्रचंड तणाव असूनही भारतानं सातत्यानं 'बॅकचॅनेल डिप्लोमसी' आणि कूटनीतिक चर्चा सुरू ठेवली होती. परिणामी या जहाजांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही दोन्ही जहाजे अनेक दिवसांपासून समुद्राच्या मध्यभागी थांबली होती. आता या दोन जहाजांची सुरक्षित सुटका होणं हे पर्शियन आखातात अडकलेल्या इतर व्यापारी जहाजांसाठीही एक सकारात्मक चिन्ह आहे. येत्या २४ ते ४८ तासांत इतर भारतीय टँकर्सनाही अशाच प्रकारची मंजुरी मिळू शकते, अशी सरकारला पूर्ण खात्री आहे.

कच्चं तेल ११२ डॉलर्सच्या पार; पेट्रोल-डिझेल कुठे महाग आणि कुठे स्वस्त? पाहा तुमच्या शहराचे नवे दर

देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर होणारा परिणाम

‘जग वसंत’ आणि ‘पाइन गॅस’ लवकरच भारतीय किनाऱ्यावर पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे देशातील स्वयंपाकाच्या गॅसच्या साठ्यात सुधारणा होईल. मात्र, सरकार केवळ आयातीवर अवलंबून राहू इच्छित नाही. भविष्यात आखाती देशांमधील कोणत्याही दीर्घकालीन अस्थिरतेचा सामना करण्यासाठी देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर काम सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तूर्तास, या दोन जहाजांच्या सुरक्षित परतीमुळे गेल्या काही दिवसांपासून गॅसची संभाव्य टंचाई किंवा रेशनिंगच्या बातम्यांमुळे चिंतेत असलेल्या लाखो भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Two LPG ships head to India after Hormuz Strait clearance.

Web Summary : Two Indian LPG ships, 'Jag Vasant' and 'Pine Gas,' stranded in the Persian Gulf due to Iran-Israel tensions, are now cleared to sail through the Strait of Hormuz. Indian Navy's diplomacy ensured their safe passage, easing gas supply concerns in India. More tankers are expected to follow soon.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरएलपीजी गॅस टंचाई