Join us  

सावध पवित्र्यामुळे निर्देशांकांमध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 7:17 AM

विविध आस्थापनांचे आर्थिक निकाल येण्याची झालेली सुरुवात आणि निवडणुकांसाठी सुरू झालेले मतदान यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे सुमारे दोन आठवड्यांनंतर निर्देशांकाने साप्ताहिक घसरण नोंदविली आहे.

ठळक मुद्देविविध आस्थापनांचे आर्थिक निकाल येण्याची झालेली सुरुवात आणि निवडणुकांसाठी सुरू झालेले मतदान यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.आर्थिक वर्षामधील ही पहिलीच घसरण आहे. आगामी काळात बाजारात अस्थिरता राहण्याची चिन्हे दिसत आहेत. परकीय वित्तसंस्थांनी मात्र भारतीय बाजाराविषयी आस्था दाखविली आहे.

प्रसाद गो. जोशी

विविध आस्थापनांचे आर्थिक निकाल येण्याची झालेली सुरुवात आणि निवडणुकांसाठी सुरू झालेले मतदान यामुळे गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. यामुळे सुमारे दोन आठवड्यांनंतर निर्देशांकाने साप्ताहिक घसरण नोंदविली आहे. आर्थिक वर्षामधील ही पहिलीच घसरण आहे. आगामी काळात बाजारात अस्थिरता राहण्याची चिन्हे दिसत आहेत. परकीय वित्तसंस्थांनी मात्र भारतीय बाजाराविषयी आस्था दाखविली आहे.

मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहाचा प्रारंभ वाढीने झाला, मात्र सप्ताहाचा विचार करता तो संमिश्र राहिला. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३९,०४१.२५ ते ३८,४६०.२५ अंशांच्या दरम्यान हेलकावत सप्ताहाच्या अखेरीस ३८,७६७.११ अंशांवर विसावला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ९५.१२ अंशांची (०.२४ टक्के) घट झाली.

राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही संमिश्र वातावरण होते. येथील निर्देशांक (निफ्टी) मध्येही सप्ताहाचा विचार करता घसरण नोंदविली गेली. हा निर्देशांक २२.५० अंश (म्हणजेच ०.१९ टक्के) खाली येऊन ११,६४३.४५ अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घसरण झाली. मिडकॅप ०.५३ टक्के म्हणजे ८२.९१ अंशांनी खाली येऊन १५,४२६.४५ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅपमध्ये २३.६९ अंशांची (०.१६ टक्के) घट झाली. सप्ताहाच्या अखेरीस तो १५,०२२.१८ अंशांवर बंद झाला आहे.

परकीय वित्तसंस्थांचा भारतीय भांडवल बाजाराबाबत सकारात्मक दृष्टीकोन दिसून आला.या वित्तसंस्थांनी बाजारात पैसे गुंतविणे कायम राखले आहे. त्याचप्रमाणे देशी म्युच्युअल फंडांनीही खरेदी कायम राखली आहे. बाजारात आता विविध आस्थापनांचे वार्षिक निकाल येण्यास प्रारंभ झाला आहे.

इन्फोसिस आणि टीसीएसच्या निकालांनी बाजाराला उभारी दिली. मात्र अन्य आस्थापनांचे निकाल कसे येतात, याची बाजार वाट बघत आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ झाल्याने गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

देशामधील स्कूटरच्या विक्रीमध्ये घट

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये देशातील स्कूटरच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. या वर्षामध्ये ६७,०१,४६९ स्कूटरची विक्री झाली. त्याआधीच्या वर्षामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये ६७,१९,९०९ स्कूटरची विक्री झाली होती. याचाच अर्थ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये स्कूटरच्या विक्रीमध्ये ०.२७ टक्क्यांनी घट झाली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार मार्च, २०१९ अखेर स्कूटरची विक्री घटली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये टीव्हीएस, सुझुकी आणि पिजारिओ या आस्थापनांची हिस्सेदारी वाढली आहे. देशातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादक आस्थापना असलेल्या हिरो मोटरसायकल आणि स्कूटर्सचा बाजारातील हिस्सा कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा त्यामध्ये ३.७ टक्क्यांनी घट झाली आहे.

 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकव्यवसाय