Join us

बाजार डामाडोल असेल तेव्हा हे करून बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 13:05 IST

सध्या शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी चढ-उतार दिसत आहे.

चंद्रकांत दडस, वरिष्ठ उपसंपादक

सध्या शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी चढ-उतार दिसत आहे. मात्र, योग्य कंपन्यांची निवड करून आणि योग्य किमतीला शेअर्स खरेदी केल्यास यातील गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळू शकतात. शेअर बाजारातील धोका किंवा अस्थिरता मोजण्यासाठी ‘बीटा’ नावाचा निर्देशांक वापरला जातो. सध्या स्मॉल व मिड कॅप कंपन्यांचा बीटा निफ्टी ५० निर्देशांकाच्या तुलनेत १ पेक्षा कमी आहे. त्यामुळे हे शेअर्स तेवढे अस्थिर नाहीत, जितके सामान्यत: समजले जातात.

स्मॉल कॅपमध्ये यंदा १७.५ टक्क्यांची वाढ 

लार्जकॅपच्या टॉप १०० कंपन्यांचे भांडवल २० हजार कोटींहू्न अधिक, मिड कॅपमधील १०१ ते २५० क्रमांकाच्या कंपन्यांचे भांडवल ५ ते ५० हजार कोटींहून अधिक, तर स्मॉल कॅपमधील २५१ वरील कंपन्यांचे बाजार भांडवल ५ हजार कोटींपेक्षा कमी आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बीएसई स्मॉल कॅपने ४.९१%, मिड कॅपने ३.९१% आणि लार्ज कॅपने ३.३% परतावा दिला आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये मोठ्या अस्थिरतेमुळे लार्ज कॅपमध्ये ६.६%, मिड कॅपमध्ये ७.१% आणि स्मॉल कॅपमध्ये १५% घसरण झाली. मात्र, चालू आर्थिक वर्षात लार्ज कॅपमध्ये १०%, मिड कॅपमध्ये १४%, तर स्मॉल कॅपमध्ये १७.५% वाढ झाली.

गुंतवणूक करताना नेमके काय लक्षात घ्यावे?

धोका हा बाजारात नाही तर आपण निवडलेल्या कंपन्यांमध्ये असतो. अनेकदा गुंतवणूकदार अलीकडे चांगला परतावा दिलेल्या कंपन्यांच्या मागे धावतात आणि नंतर नुकसान सहन करतात. योग्य कंपन्या व योग्य किंमतीवर लक्ष केंद्रित केल्यास स्मॉल व मिड कॅप फंड चांगले रिटर्न्स मिळतात. ५५:२३:२२ या प्रमाणात लार्ज, मिड व स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करता येईल. यामुळे स्थिरतेसह वाढीचाही लाभ मिळतो.

दीर्घकालीन गुंतवणूक करा

जागतिक घडामोडी, अनिश्चिततेमुळे सध्या बाजार अस्थिर आहे. अशा वेळी संतुलित पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे. स्मॉल व मिड कॅप कंपन्या त्यांच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असतात, त्यामुळे त्या अधिक अस्थिर असतात. मात्र, दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्यांसाठी त्या फायदेशीर ठरतात.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार