Join us

ट्रम्पच्या धमकीची किंमत ९१ हजार कोटी! सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:16 IST

अमेरिकेच्या टॅरिफ आणि दंडामुळे भारताचा कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज; खर्च वाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका? 

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेच्या धमकीपुढे झुकत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली तर भारताचा तेल आयातीवरचा खर्च वर्षाला तब्बल ७४,७०० कोटी ते ९१,३०० कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे, तसेच या संभाव्य खर्च वाढीमुळे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या किरकोळ किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा तेल वापरकर्ता आणि आयातदार देश आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले. त्यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून मोठा फायदा मिळवला.

मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल व शस्त्रास्त्रे खरेदी केल्यास दंड लावण्याची धमकी दिल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेने टॅरिफसंदर्भातील अधिसूचना जारी केली असली, तरी दंड किती लावला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रशियन तेल खरेदीबाबत भारताची भूमिका काय ?भारत सरकारने तेल कंपन्यांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आदेश दिलेले नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

अमेरिकेच्या दबावामुळे भारत धोरण बदण्याची शक्यता सध्या तरी नाही. मात्र, सरकारी कंपन्यांना पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले आहे, तरीही रशियन तेल खरेदी सध्या सुरूच आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकन तेलाच्या आयातीत झाली तब्बल ११४% वाढ!राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलावर नाराजी व्यक्त केली होती; पण भारताने गेल्या तीन महिन्यांत अमेरिकेकडून तब्बल ११४% जास्त कच्चे तेल खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

२०२५च्या एप्रिल ते जून या तिमाहीत, भारताने अमेरिकेकडून ३०,७१० कोटी रुपयांचे तेल आयात केले. गेल्या वर्षी याच काळात ही आयात केवळ १४,३५९ कोटी रुपयांवर होती.

जानेवारी ते २५ जून २०२५ या कालावधीत भारताने अमेरिकेकडून ५१% अधिक कच्चे तेल आयात केले. गेल्या वर्षी ०.१८ मिलियन बॅरल प्रति दिवस इतकी आयात होती, ती यंदा ०.२७१ मिलियन बॅरल प्रति दिवसावर गेली आहे.

भारताचा रशियन कच्च्या तेलाचा आयात दर जूनमध्ये २१ लाख बॅरल प्रति दिवसावरुन जुलैमध्ये १८ लाख बॅरल प्रति दिवसावर आला आहे.

युरोपियन संघाच्या निर्बंधांचा भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांवर परिणाम होईल, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या शुल्कामुळे भारत-रशिया तेल व्यापारावर थेट परिणाम होईल.

एलएनजी आयातीतही अमेरिकेचा वाटा वाढला२०२४-२५ - २०,४१८ कोटी २०२३-२४ - ११,७०३ कोटी

टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पखनिज तेलभारतरशिया