Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क वाढवण्याची धमकी दिली आहे. यामागचं कारण भारत रशियाकडून खरेदी करत असलेलं कच्चं तेल असल्याचं म्हटलंय. यानंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील या संघर्षादरम्यान चायना मार्केट रिसर्चचे संस्थापक शॉन रिन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भारताला चीनसोबतचे संबंध सुधारण्याचा सल्ला दिला. जपान आणि चीनप्रमाणेच ट्रम्प भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवता येणार नाही, हे ट्रम्प यांच्या धमकीनं सिद्ध झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
नुकताच जपान आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला आहे. तज्ज्ञांच्या मते तो पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूनं आहे. या कराराच्या माध्यमातून अमेरिकेनं जपानची फसवणूक केली. जपाननं अमेरिकेच्या दबावापुढे झुकल्याचं दर्शविणाऱ्या अनेक अटी या करारात आहेत. दरम्यान, ओआरएफचे हर्ष व्ही पंत यांनी म्हटलंय की, भारतानं अमेरिका आणि चीनमध्ये समतोल साधण्याची गरज आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध बिघडले होते. मात्र, आता राजनैतिक आणि आर्थिक प्रयत्नांनी संबंध हळूहळू सुधारत आहेत.
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
भारताला घेरण्याचा प्रयत्न
शॉन रेन हे अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे टीकाकार आहेत. सोमवारी त्यांनी भारताला चीनसोबतच्या धोरणांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं. अलिकडच्या घडामोडी त्यांच्या पूर्वी दिलेल्या इशाऱ्यांना योग्य ठरवत असल्याचं शॉन रेन म्हणाले. "'मी अनेक वर्षांपासून भारताला इशारा देत आहे की अमेरिका जपानप्रमाणेच भारताला घेरण्याचा प्रयत्न करेल आणि चीनसोबतही तसंच वागण्याचा प्रयत्न करत आहे. अन्यथा तुम्ही युरोपियन युनियनसारखेच बनाल. भारतीयांनी माझ्यावर टीका केली आणि म्हटलं की चीन हा एक मोठा धोका आहे. पण, ट्रम्प यांच्या धमकी आणि शुल्कानंतर कोण बरोबर आहे हे सिद्ध झाले? भारतानं चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करावे," असंही ते म्हणाले.
यापूर्वी दिलेला इशारा
मे महिन्यात रेन यांनी एका मुलाखतीत असंच काहीसं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत भारताची अर्थव्यवस्था चीनच्या जवळ नेली पाहिजे. भारतीयांनी अमेरिकेवर विश्वास ठेवू नये. जर भारत खूप शक्तिशाली झाला, ज्याला १० ते २० वर्षे लागू शकतात, तर अमेरिकन भारताला नष्ट करण्याचा आणि घेरण्याचा प्रयत्न करतील, असं रेन म्हणाले होते.