Join us

कॅश नव्हे, मोबाइल पेमेंट; छोट्या शहरांमध्येही क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 13:12 IST

६५ टक्के व्यवहारांमध्ये रोखीला फाटा

मुंबई : रोख व्यवहारांना फाटा देऊन डिजिटल पेमेंट करण्याचा कल आता छोट्या शहरांतही पसरला असून छोट्या शहरांतील तब्बल ६५ टक्के आर्थिक देवाण घेवाण आता डिजिटल पेमेंटद्वारे केली जात आहे. ‘किर्नी इंडिया’ आणि ‘अमेझॉन पे  इंडिया’च्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

या दोन्ही संस्थांनी तयार केलेल्या अहवालानुसार, मिलेनिअल्स (वय २५ ते ४३ वर्षे) आणि जेन एक्स (वय ४४ ते ५९ वर्षे) हे भारताच्या डिजिटल पेमेंट क्रांतीचे नेतृत्व करीत आहेत. बूमर्सकडून (वय ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक) तरुणांपेक्षा अधिक कार्डे व ई-वॉलेटचा वापर केला जात आहे.

या सर्वेक्षणात १२० शहरांतील ६ हजाआंपेक्षा अधिक ग्राहक आणि १ हजारपेक्षा अधिक व्यापारी यांना सहभागी करून घेण्यात आले. रोजच्या देवाण-घेवाणीत ते पेमेंटसाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात हे जाणून घेण्यात आले. ६९ टक्के व्यापारी देवाण घेवाणीसाठी डिजिटल मोडचा वापर करीत आहेत. डिजिटल व्यवहार सोपे असल्यामुळे त्यांचा वापर वाढला आहे.

तरुणांत लोकप्रिय

अहवालात म्हटले आहे छोट्या शहरांत आता ६५ टक्के व्यवहार डिजिटल पेमेंटद्वारे होत आहे. मोठ्या शहरांत हे प्रमाण ७५ टक्के आहे. ग्रामीण भागातही याला पसंती मिळताना दिसत आहे. 

किर्नी इंडियाच्या फायनान्शिअल सर्व्हिसेसचे भागिदार शाश्वत शर्मा यांनी सांगितले की, ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारच्या व्यवहारांत तरुण वर्ग डिजिटल पेमेंटचा पर्याय वापरत आहे.

टॅग्स :व्यवसायडिजिटलपैसा