Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा समन्स, तरीही टीना अंबानी गैरहजर! आता ईडीचे पुढचे पाऊल काय? अनिल अंबानी उद्या हजर होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:36 IST

Money Laundering Case : हे प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेदरम्यान २०२३ मध्ये झालेल्या मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

Money Laundering Case : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या पत्नी आणि माजी अभिनेत्री टीना अंबानी मंगळवारी पुन्हा एकदा अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन बजावले होते. मात्र, सलग दुसऱ्या वेळी त्यांनी या समन्सकडे पाठ फिरवली आहे.

न्यूयॉर्कमधील 'लक्झरी' घराचा फेरा?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीना अंबानी यांची चौकशी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील एका अत्यंत महागड्या आणि आलिशान निवासी मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. या मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेला पैसा कुठून आला आणि त्याचे व्यवहार नियमांनुसार झाले आहेत का, याची तपासणी ईडी करत आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी त्यांना पहिले समन पाठवण्यात आले होते. त्यावेळी त्या गैरहजर राहिल्याने पुन्हा नोटीस बजावण्यात आली होती. आता ईडी त्यांना चौकशीसाठी तिसरी तारीख देण्याची शक्यता आहे.

'आरकॉम'च्या दिवाळखोरी प्रक्रियेशी संबंध?हे संपूर्ण प्रकरण रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या 'कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया' दरम्यान २०२३ मध्ये झालेल्या एका मालमत्ता विक्रीशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. ईडीच्या मते, ही मालमत्ता 'फसवणुकीच्या' उद्देशाने विकली गेली होती. विशेष म्हणजे, आरकॉमने या कथित विक्रीची माहिती २०२५ मध्ये शेअर बाजाराला दिली होती, ज्यावरून आता तपास यंत्रणांनी आपला फास आवळला आहे.

वाचा - बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी; सरकारी बँका आणि आयटी शेअर्समध्ये जोर, सेन्सेक्स ८३,४०० पार

उद्या अनिल अंबानींची वेळ!पत्नी टीना अंबानी गैरहजर राहिल्या असल्या, तरी आता सर्वांचे लक्ष बुधवारी होणाऱ्या अनिल अंबानी यांच्या चौकशीकडे लागले आहे. रिलायन्स समूहातील विविध कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित बँक कर्जाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी अनिल अंबानींना बोलावण्यात आले आहे. याआधी ऑगस्ट २०२५ मध्ये देखील अनिल अंबानी ईडीसमोर हजर झाले होते. धन शोधन प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स कम्युनिकेशनअंमलबजावणी संचालनालयधोकेबाजी