कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (EPFO) संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशा अनेक सुविधा मिळतात, ज्यांसंदर्भात फार कमी लोकांना माहिती आहे. अशीच एक सुविधा पेन्शनशी संबंधित आहे. खरे तर, EPFO कडून कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत (EPS) मुलांना पेन्शन देण्याचीही तरतूद आहे. मात्र, ही सुविधा केवळ अनाथ मुलांनाच मिळते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, ज्या मुलांचे पालक नोकरी करत होते आणि EPS सदस्य होते, अशीच मुले ही पेन्शन मिळण्यास पात्र आहेत.
किती पेन्शन मिळते -EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, या पेंशनची रक्कम मासिक विधवा पेंशनच्या 75 टक्के आहे. ही रक्कम एका वेळी दोन अनाथ मुलांना दिली जाते. ही किमान रक्कम 750 रुपये प्रति महिना एवढी असते. अर्थात EPS अंतर्गत 2 अनाथ मुलांना दरमहिन्याला 1500 रुपये मिळतात.
विधवा महिलांना पेन्शन - या योजनेंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या पत्नीला मासिक विधवा पेन्शनही दिले जाते. या पेन्शन अंतर्गत किमान 1000 रुपये मिळतात. तसेच, कर्मचाऱ्याला मुले असतील तर त्याच्या 2 मुलांनाही 25 वर्षापर्यंत मासिक पेन्शन मिळते. मुलांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम विधवा पेन्शनच्या 25 टक्के असते. मात्र, यासाठी, कर्मचाऱ्याने मृत्यूपूर्वी पेन्शनसाठी आवश्यक असलेल्या अटी फॉलो करणे आवश्यक आहे.