Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करत जगभरातील देशांना जबर धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलचं नामकरण लिबरेशन डे असं करतानाचा विविध देशांकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी भारतालाही जोरदार धक्का दिला आणि त्यांनी भारतावर २६ टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ६० देशांवर लादलेलं परस्पर शुल्क हा सेल्फ गोल असल्याचं म्हटलं. त्याचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, असंही ते म्हणाले.
ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामुळे 'उलटा' परिणाम होईल आणि शेवटी अमेरिकेच्याच अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल, असं राजन यांना वाटतं. शुल्क लागू केल्याने अमेरिकन ग्राहकांसाठीच्या वस्तूच्या किंमती वाढतील, ज्यामुळे मागणी कमी होईल आणि आर्थिक विकासावर परिणाम होईल, असंही रघुराम राजन यांनी नमूद केलं.
PF मधून पैसे काढणं झालं आणखी सोपं; बदलले काही नियम, आता क्लेम सेटलमेंट होणार अगदी झटपट
भारतावर कमी परिणाम होईल
या शुल्काचा भारतावर होणारा परिणाम 'कमी' असेल. याचं कारण म्हणजे अमेरिकेनं अनेक देशांवर शुल्क लादलं आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना काहीसा दिलासा मिळेल, कारण अमेरिकन ग्राहकांकडे मर्यादित पर्याय असतील, असं राजन म्हणाले.
भारतात महागाई वाढणार नाही
अमेरिकेनं भारतावर लादलेल्या शुल्कामुळे महागाई वाढणार नाही कारण भारत कमी निर्यात करेल, ज्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंची उपलब्धता वाढेल, असंही रघुराम राजन यांचं म्हणणं आहे. भारतानं आपले शुल्क कमी करावं, ज्यामुळे अमेरिकेचं शुल्क कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर भारताने आसियान, जपान, आफ्रिका आणि युरोपातील इतर देशांशी आपले व्यापारी संबंध मजबूत करण्याची गरज आहे. चीनसोबत समानतेचे संबंध प्रस्थापित करणे आणि शेजाऱ्यांशी मजबूत संबंध प्रस्थापित करणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजन यांनी दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेसारख्या (सार्क) प्रादेशिक संघटनांशी सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. जग प्रादेशिक गटांमध्ये विभागलं जात असल्यानं दक्षिण आशियानं एकटं राहू नये, असा सल्लाही त्यांनी दिलाय.