Donald Trump Tariff Russian Oil: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या बैठकीत युद्ध थांबवण्याबाबत कोणताही करार होऊ शकला नाही, परंतु दोन्ही नेत्यांमधील चर्चा फलदायी ठरली. सध्या रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर नवीन शुल्क लादण्याचा विचार करण्याची गरज नाही, असं ट्रम्प यावेळी म्हणाले. परंतु 'दोन किंवा तीन आठवड्यांत' या मुद्द्यावर पुनर्विचार करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी नवीन टॅरिफबद्दल भाष्य केलं. आज जे घडले त्यामुळे मला वाटते की त्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. आता, मला कदाचित दोन किंवा तीन आठवड्यांत याबद्दल विचार करावा लागेल, परंतु सध्या आपल्याला त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. चीननं रशियन कच्चं तेल खरेदी केल्याच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं.
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
भारताबाबत काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारतावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्याच्या त्यांच्या निर्णयानं रशियाला बैठकीसाठी प्रेरित केलं. "जेव्हा मी भारताला सांगितलं की तुम्ही रशियासोबत व्यवसाय करत आहात आणि कच्चं तेल खरेदी करत आहात म्हणून आम्ही तुमच्याकडून शुल्क घेऊ, यावरुन रशियावर दबाव आला आणि नंतर रशियानं फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली," असं ट्रम्प म्हणाले.
रशियाला भारताचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक गमावल्यानं पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर यावं लागलं, असा युक्तीवाद ट्रम्प यांनी केला. भारत हा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि तो चीनच्या खूप जवळ येत आहे. चीन हा रशियन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे, असंही ते म्हणाले.
रशियन कच्च्या तेलावर बंदी नाही
दुसरीकडे, भारतानं त्यांच्या कच्च्या तेलाच्या खरेदी धोरणात कोणताही बदल केल्याचं स्पष्टपणे नाकारलं आहे. गुरुवारी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एएस साहनी म्हणाले की रशियाकडून तेल आयातीवर कोणतेही बंदी नाही आणि आर्थिक आधारावर खरेदी सुरूच राहील. परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांच्या शुल्काला अन्यायकारक म्हटलं आहे आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याचं वचन दिलं आहे.
२७ ऑगस्टपासून ५० टक्के टॅरिफ
गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला होता आणि त्यात आणखी २५% वाढ करण्याची घोषणा केली होती, जी २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे भारतावरील एकूण कर ५०% पर्यंत वाढेल.