Join us

अमेरिकेतही मोदींसारख्या नेत्याची नितांत गरज, कोणी केलं कौतुक? अब्जोवधींच्या कंपनीचे आहेत प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 15:52 IST

भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अविश्वसनीय काम' केलं असल्याचं जेमी डिमन म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता जगभरात किती वाढत आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येतो की, त्यांच्यासारख्या नेत्याची अमेरिकेतही गरज असल्याचं लोक म्हणू लागले आहेत. जगातील दिग्गज जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे सीईओ जेमी डिमन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतासाठी 'अविश्वसनीय काम' केलं असल्याचं ते कौतुक करताना म्हणाले. 

"ते सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जात आहेत. मला इथल्या लिबरल प्रेसबद्दल माहीत आहे, ते त्यांना टार्गेट करत आहेत. त्यांनी ४० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय आहे," असं डिमन यावेळी म्हणाले. त्यांच्या कठोर असण्याबद्दल आणि देशाच्या नोकरशाही व्यवस्थेचं निराकरण केल्याबद्दल डिमन यांनी मोदींची प्रशंसा केली. तसंच अमेरिकेलाही याची थोडी गरज असल्याचं म्हटलं. इकॉनॉमिक क्लब ऑफ न्यूयॉर्कद्वारे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

भ्रष्टाचारही संपवला 

अप्रत्यक्ष करप्रणालीतील सुधारणांमुळे विविध राज्यांच्या कर दरांमधील तफावत तर कमी झालीच, पण त्यामुळे भ्रष्टाचारही दूर झाला आहे, असंही डिमन म्हणाले. "प्रत्येक नागरिकाची ओळख डोळ्यांच्या बुबुळांच्या माध्यमातून किंवा बोटांच्या ठशांद्वारे केली जाते. त्यांच्याकडे ७० कोटी लोकांची बँक खाती आहेत. पैसे थेट त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात," असंही ते म्हणाले.

टॅग्स :नरेंद्र मोदीअमेरिका