Join us

बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 19:30 IST

Gautam Adani Bribe Case: भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत लागलेल्या आरोपांवर परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायडेन यांच्यासारखीच स्मरणशक्ती हरवत चालली असल्याची टीका केली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली आहे. राहुल गांधी यांनी मोदींबद्दल केलेली टिप्पणी दुर्दैवी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. 

भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी दोन्ही बाजूंच्या चिकाटी, एकजुटीने, परस्पर आदर आणि वचनबद्धतेमुळे निर्माण झाली आहे. राहुल यांचे हे वक्तव्य त्याला साजेसे नाही असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. 

भारताचे उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात अमेरिकेत लागलेल्या आरोपांवर परराष्ट्र मंत्रालयाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अदानी प्रकरण कायदेशीर आहे. यामध्ये खासगी संस्था, व्यक्ती आणि अमेरिकेचा न्याय विभाग सहभागी आहेत. या प्रकरणात भारताला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. 

अशा प्रकरणांसाठी काही प्रक्रिया आणि कायदेशीर मार्ग आहेत. त्याचे पालन केले जाईल असे आम्हाला वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही या प्रकरणात अद्याप अमेरिकी सरकारशी कोणतीही चर्चा केलेली नाही. समन्स/अटक वॉरंटच्या सेवेसाठी परदेशी सरकारने केलेली कोणतीही विनंती परस्पर कायदेशीर सहाय्याचा भाग आहे. अशा विनंत्या योग्यतेवर हाताळल्या जातात. या प्रकरणी अमेरिकेकडून आम्हाला कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही. ही बाब खाजगी संस्थांशी संबंधित आहे आणि भारत सरकार सध्या कोणत्याही प्रकारे कायदेशीररित्या त्याचा भाग नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावरील आरोप अदानी समूहाने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. गौतम अदानी आणि इतरांनी भारतातील सौरऊर्जा करार जिंकण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप यूएस न्याय विभागाच्या आरोपात ठेवण्यात आलेला आहे. याबाबत अमेरिकेत अदानींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. या आरोपपत्रात केवळ आरोप करण्यात आले असून, आरोपांबाबत कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नाही, असा दावा उद्योग समुहाने केला आहे. 

मात्र, या या मुद्द्यावरून विरोधक संसदेत सरकारला सातत्याने घेरत आहेत. त्यामुळे सलग चार वेळा संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. तसेच राहुल गांधी देखील अदानींवरून जोरदार टीका करत आहेत. यामुळे भारतातील राजकीय वातावरण तापलेले आहे.  

टॅग्स :राहुल गांधीकेंद्र सरकारअमेरिकागौतम अदानीनरेंद्र मोदी