Donald Trump and Elon Musk : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची मैत्री जगजाहीर आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांचे जाहीर समर्थन केले. ते फक्त पाठिंबा देऊन थांबले नाही तर ट्रम्प यांच्या प्रचारात पाण्यासारखा पैसा ओतला. निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनीही मैत्रिची कदर राखत मस्क यांचा मंत्रिमंडळात समावेश करत मानाचं पान दिलं. मात्र, या दोघांच्यात आता बिनसलं असल्याची चर्चा आहे. कारण, एकीकडे मस्क यांनी सरकारी खर्चात कपात करण्याच्या नावाखाली मोठी नोकर कपात सुरू केली आहे. ज्यामुळे लोक सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. तर ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने मस्क अडचणीत आले आहेत. याहीपेक्षा ट्रम्प यांनी आता जाहीरपणे मला मस्क यांची गरज नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, 'इलॉन मस्क यांनी खूप चांगले काम केले आहे, मला त्यांच्याकडून आता काहीही नको, मला तो फक्त आवडतो.' या माणसाने खूप छान काम केले आहे. पण, मी कोणत्याही कामासाठी या अब्जाधीशावर अवलंबून नाही. पॉलिटिकोच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या सहाय्यकांना असेही सांगितले आहे की, इलॉन मस्क लवकरच प्रशासनातील त्यांच्या भूमिकेतून पायउतार होतील आणि सार्वजनिक बाबींमध्ये त्यांचा सहभाग देखील संपेल.
मस्क यांचे पद काढून घेणार?डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात इलॉन मस्क यांना मोठी भूमिका दिली जाण्याची अपेक्षा होती. सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि खर्चात कपात करण्यासाठी तयार केलेल्या 'डॉज' विभागात त्यांना एक महत्त्वाचे पद मिळणे अपेक्षित होते. पण आता हे स्पष्ट झाले आहे की मस्क यांना ही भूमिका दिली जाणार नाही. अलिकडेच, इलॉन मस्क व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर, ट्रम्प यांच्याशी असलेल्या त्यांच्या वाढत्या जवळीकतेबद्दल लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांच्यावर मस्क यांच्या फायद्यासाठी त्यांच्या पदाचा वापर केल्याचा आरोपही करण्यात आला.
वाचा - ट्रम्प टॅरिफनंतर चीनचं 'या' क्षेत्रात वर्चस्व कायम! अमेरिकचं तर नावही नाही, भारताचा नंबर घसरला
मस्क यांचा ट्रम्प टॅरिफला विरोधनिवडणुकीपूर्वी आणि नंतर मस्क आणि ट्रम्प यांच्यात खूप जवळीक होती. परंतु, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व काही बदलले. त्यांच्या या निर्णयामुळे मस्क यांची एकूण संपत्ती सुमारे १२ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. टेस्लासह इतर कंपन्यांच्या शेअर्सचेही मोठे नुकसान झाले. यानंतर, मस्क यांनी शुल्कावर टीका करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. ट्रम्प यांच्या या धोरणाला मस्क यांच्या भावानेही विरोध केला होता.