The Ujala Story : मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाने या कंपनीचे उत्पादन कधी ना कधी नक्कीच वापरलं असेल. आम्ही सांगतोय तुमच्या पांढऱ्या रंगाच्या गणवेशाला चमक देणाऱ्या निळीबद्दल. पण, या छोट्याश्या उत्पादनातून एका व्यक्तीने आज १३,५०० कोटी रुपयांचे साम्राज्य उभं केल्याचं माहीत आहे का? ही यशोगाथा आहे केरळमधील एम पी रामचंद्रन यांची. त्यांनी कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीशिवाय किंवा लक्झरी उत्पादनाशिवाय, फक्त २ रुपयांच्या एका साध्या वस्तूने कोट्यवधी रुपयांचे एक विशाल साम्राज्य उभे केले.
एम पी रामचंद्रन यांची गोष्ट केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून सुरू होते. बी.कॉमची पदवी घेतल्यानंतर ते अकाउंटंट म्हणून नोकरी करत होते, पण त्यांचे मन नेहमीच काहीतरी वेगळे आणि सर्जनशील करण्याची इच्छा बाळगून होते. त्यांना कपड्यांसाठी एक लॉन्ड्री व्हाईटनर (वॉशिंग नील) बनवायचे होते.
असा झाला 'उजाला'चा जन्मआपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयोग करणे सुरू केले. एका मासिकात त्यांना माहिती मिळाली की जांभळ्या रंगाचा वापर कपड्यांना अधिक चमकदार आणि पांढरे बनवू शकतो. या माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्या घरातच प्रयोग करणे सुरू केले. एका वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना 'उजाला नील' बनवण्यात यश आले.
त्यानंतर, रामचंद्रन यांनी ५,००० रुपयांचे कर्ज घेऊन एक छोटा कारखाना सुरू केला आणि आपल्या मुलीच्या नावावरून त्याला 'ज्योती' असे नाव दिले. त्यांचा 'उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर' हा अत्यंत कमी किमतीचा आणि प्रभावी प्रॉडक्ट देशभर इतका लोकप्रिय झाला की तो घरोघरी वापरला जाऊ लागला.
आज १३,५८३ कोटींची 'ज्योती लॅब्स'आज 'ज्योती लॅबोरेटरीज' ही एकाच ब्रँडची कंपनी राहिली नसून, ती एक मल्टी-ब्रँड कंपनी बनली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल १३,५८३ कोटी रुपये आहे. 'उजाला' व्यतिरिक्त, 'मॅक्सो' मॉस्किटो रिपेलेंटसारखे त्यांचे इतर उत्पादनेही खूप लोकप्रिय आहेत.
वाचा - २५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
एम पी रामचंद्रन यांची ही कहाणी हेच दाखवून देते की योग्य कल्पना, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर एक सर्वसामान्य व्यक्तीही मोठं साम्राज्य उभं करू शकते.