Textile Industry Trade Deal: अमेरिका आणि बांगलादेश यांनी सोमवारी एका व्यापारी करारावर स्वाक्षरी केली असून, दोन्ही देशांना आपले आर्थिक संबंध अधिक दृढ करायचे आहेत. या नवीन करारांतर्गत बांगलादेशातून अमेरिकेला जाणाऱ्या मालावर आता १९% टॅरिफ आकारले जाईल, जे पूर्वी २०% होतं. विशेष म्हणजे अमेरिकेनं काही दिवसांपूर्वीच भारतासोबतही व्यापारी करार केला होता, ज्यामध्ये टॅरिफ ५० टक्क्यांवरून घटवून १८ टक्के करण्यात आला होता. मात्र, बांगलादेशसोबत केलेल्या या नव्या करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी खेळी खेळली असून, याचा भारताला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
टेक्सटाईल क्षेत्रासाठी 'झिरो' टॅरिफची सवलत
बांगलादेशसोबतच्या या नवीन करारात अमेरिकेनं आश्वासन दिलंय की, बांगलादेशातून येणाऱ्या ठराविक टेक्सटाईल आणि कपड्यांच्या शिपमेंटवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, म्हणजेच त्यावर 'झिरो' टॅरिफ असेल. मात्र, ही सवलत केवळ अशाच कपड्यांना मिळेल जे अमेरिकन कापूस आणि सिंथेटिक फायबरपासून बनलेले असतील. बांगलादेशचे एनएसए रहमान यांच्या मते, अमेरिकन इनपुटपासून बनवलेल्या कपड्यांच्या निर्यातीवर शून्य शुल्क लागल्यामुळे बांगलादेशच्या गारमेंट क्षेत्राला मोठी उभारी मिळेल. टॅरिफ कमी झाल्यामुळे बांगलादेशी निर्यातदारांना अमेरिकन बाजारपेठेत आपलं उत्पादन विकणं अधिक सोपं आणि फायदेशीर ठरणार आहे.
घर घेण्याचा विचार करताय? HDFC बँकेकडून ग्राहकांना दिलासा, एमसीएलआर दरात कपात; कर्ज स्वस्त होणार
भारतीय कापड उद्योगासमोर मोठं आव्हान
डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशसोबत केलेल्या या कराराने भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेनं अमेरिकन कापूस वापरणाऱ्या बांगलादेशी कपड्यांवरील टॅरिफ शून्य केला आहे, तर भारतासाठी हे शुल्क १८ टक्के आहे. यामुळे बांगलादेशी कापड अमेरिकेत भारतीय कपड्यांच्या तुलनेत स्वस्त मिळेल आणि साहजिकच अमेरिकन कंपन्या भारताऐवजी बांगलादेशला पसंती देतील. भारत अमेरिकेकडून २०० मिलियन डॉलरचा कापूस खरेदी करतो आणि बांगलादेश २५० दशलक्ष डॉलरचा खरेदी करतो. ५० दशलक्ष डॉलरच्या या फरकानंतरही भारताला १८% अतिरिक्त कराचे नुकसान सोसावं लागत आहे. बांगलादेशला मिळालेल्या ड्युटी-फ्री सुविधेमुळे भारताचा जुना टॅरिफ संदर्भातील फायदा आता संपला आहे.
भारतावर अटींचं ओझं आणि ट्रम्प यांची भूमिका
बांगलादेशसोबतच्या करारात ट्रम्प यांनी भारताला अनेक प्रकारे अडचणीत आणलं आहे. भारतासोबतच्या करारात ट्रम्प यांनी अशी अट ठेवली आहे की, आगामी काही वर्षांत भारताला अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलरचा माल खरेदी करावा लागेल. याउलट बांगलादेशसोबतच्या करारात अशी कोणतीही जाचक अट ठेवण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत, भारताला टॅरिफमध्ये थोडी सवलत मिळाली असली तरी ५०० अब्ज डॉलरच्या खरेदीची अट भारतावर मोठं ओझं ठरणार आहे. या संपूर्ण व्यवहारामुळे भारतीय कापड उद्योगाचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Web Summary : US trade deal favors Bangladesh's textile industry with zero tariffs on specific goods, impacting India's competitiveness despite cotton imports. India faces stricter purchase conditions.
Web Summary : अमेरिकी व्यापार समझौते से बांग्लादेश के कपड़ा उद्योग को लाभ, भारत की प्रतिस्पर्धा प्रभावित। भारत को सख्त खरीद शर्तों का सामना करना पड़ रहा है।