Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘टेस्ला’ लवकरच भारतात, कंपनीने १३ पदांसाठी अर्ज मागवले, पंतप्रधानांच्या भेटीनंतर भरतीला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:26 IST

टेस्ला कंपनीला ई-मेलद्वारे विचारण्यात आले की, ही भरती म्हणजे कंपनीच्या भारतातील बाजारपेठेतील प्रवेशाच्या योजनेचा भाग आहे का, भारतात विक्री कधीपर्यंत सुरू केली जाईल? परंतु यावर कंपनीकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाची लवकरच भारतात एन्ट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने भारतातील विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. कंपनीने आपल्या लिंक्डइन अकाैंटवर १३ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही पदे मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असल्याचे दिसते.

टेस्ला कंपनीला ई-मेलद्वारे विचारण्यात आले की, ही भरती म्हणजे कंपनीच्या भारतातील बाजारपेठेतील प्रवेशाच्या योजनेचा भाग आहे का, भारतात विक्री कधीपर्यंत सुरू केली जाईल? परंतु यावर कंपनीकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच अमेरिकेत भेट झाली होती. त्यानंतर कंपनीच्या भारतातील भरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

कोणत्या पदांसाठी भरती?

सेवा सल्लागार, पार्ट स ॲडवायझर, सर्व्हिस टेक्निशियन, सर्व्हिस मॅनेजर, सेल्स ॲन्ड कस्टमर सपोर्ट, स्टोअर मॅनेजर, बिझनेस ऑपरेशन ॲनालिस्ट, कस्टमर सपोर्ट सुपरवायझर, कस्टमर सपोर्ट अनालिस्ट, डिलीव्हरी ऑपरेशन स्पेशालिस्ट, ऑर्डर ऑपरेशन स्पेशालिस्ट, अंतर्गत सेल्स ॲडवायझर, कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर

किती आहे कारची किंमत? : अमेरिकन बाजारात टेस्लाच्या ६ इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कारची ३ मॉडेल आहेत. अमेरिकेत या कारची किंमत २९,९९० डॉलर  इतकी (सुमारे २६ लाख रुपये) आहे. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ५३५ किलोमीटरचे अंतर कापू शकते.

सरकारच्या ईव्ही धोरणाचा लाभ

काही आठवड्यांपूर्वी सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले. यानुसार, ५० कोटी डॉलरच्या किमान गुंतवणुकीसह भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करणाऱ्या कंपन्यांना आयात शुल्कात सवलत दिली जाणार आहे. या धोरणामुळे टेस्लाच्या भारतात येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

भारतातील उच्च आयात करामुळे टेस्लाने भारतीय बाजारपेठेत प्रवेश टाळला होता. मात्र, सरकारने ४०,००० डॉलरपेक्षा (सुमारे ३५ लाख रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांवरील आयात कर ११० टक्केवरून ७० टक्के पर्यंत कमी केला आहे. याचाही टेस्ला कंपनीला लाभ होणार आहे.

कारखान्यासाठी जमिनीचा शोध सुरू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेस्ला भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लँट सुरू करावयाचा आहे. यासाठी योग्य जागा शोधण्याचे काम सुरू आहे.

यासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडू यांसारख्या ऑटोमोबाईल हब असलेल्या राज्यांना कंपनीकडून प्राधान्य दिले जाणार आहे. याआधी, एप्रिल २०२४ मध्ये मस्क यांनी टेस्लाच्या विविध जबाबदाऱ्यांचा हवाला देत आपली प्रस्तावित भारत भेट स्थगित केली होती.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कटेस्ला